Pune Metro | पुणे मेट्रोचा विक्रम; साडेपाच हजार फेऱ्यांमध्ये तीन महिन्यांत १० लाख प्रवासी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 03:11 PM2022-06-18T15:11:03+5:302022-06-18T15:12:25+5:30
६ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाले होते
पुणे : महामेट्रोनेपुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही मार्गांवर मिळून साडेतीन महिन्यांमध्ये १० लाख प्रवासी संख्येचा टप्पा ओलांडला. या काळात मेट्रोला १ कोटी ४७ लाख ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यासाठी मेट्रोच्या दोन्ही शहरांत मिळून ५ हजार ५८१ फेऱ्या झाल्या. ६ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाले होते.
महामेट्रोच्या वतीने त्यानिमित्त शनिवारी (दि. १८) प्रवाशांसाठी दोन्ही मार्गांवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवासीही मेट्रोत कवी संमेलन किंवा यासारखे उपक्रम करू शकतात.
वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या मार्गावर सध्या मेट्रो सुरू आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक अशा २,४८३ फेऱ्या झाल्या. वनाज ते गरवारे कॉलेज स्थानक ३,०९८ फेऱ्या झाल्या. मेट्रोचा मूळ मार्ग वनाज ते रामवाडी तसेच पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असा आहे. त्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट हा साधारण ६ किलोमीटरचा मार्ग भुयारी आहे. भुयारी मार्गाच्या दोन्ही भुयारांचे खोदकाम पूर्ण झाले असून, आता भुयारी स्थानकांचे काम सुरू आहे.
उर्वरित उन्नत मार्गांचे कामही सुरू आहे. सध्या सुरू असलेल्या दोन्ही मार्गांवर सुरूवातीच्या महिनाभरात होती तेवढी गर्दी मेट्रोला सध्या नाही. अंतर वाढले व संपूर्ण मार्गावर मेट्रो सुरू झाली की प्रवासी संख्या, फेऱ्या व त्यातून उत्पन्न यातही वाढ होईल असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.