Pune Metro: पुणेकरांची मेट्रो लवकरच धावणार; जाणून घ्या वेगमर्यादा अन् तिकीटदर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 07:06 PM2022-01-10T19:06:13+5:302022-01-10T19:06:24+5:30
पुणेकर व पिंपरी- चिंचवडकरांनाही चकीत करतील अशा अनेक गोष्टी पुणे मेट्रोत आहेत
पुणे : वनाजपासून गरवारे महाविद्यालयापर्यंत सायकल, रिक्षा, स्कुटर, मोटारसायकल अगदी कसेही आले तरी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागणारच! याच मार्गावरची मेट्रो मात्र हेच अंतर फक्त १२ मिनीटात तोडणार आहे. तेही विनाखोळंबा. एकदोन नाही तर चक्क ९४० प्रवासी घेऊन!
पुणेकर व पिंपरी- चिंचवडकरांनाही चकीत करतील अशा अनेक गोष्टी पुणे मेट्रोत आहेत. म्हणजे वातानूकुलीत डबे, जे स्थानक येईल त्या स्थानकाच्या नावाचा डब्यात डिस्प्ले, त्याची ध्वनीमुद्रीत घोषणा या नेहमीच्या गोष्टी तर आहेतच, पण महामेट्रोने पुणेकरांची आवडनिवड लक्षात घेत काही गोष्टी नव्याने केल्या आहेत.
स्थानकांचे बाह्याकार
छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील मेट्रो स्थानकाचा बाह्याकार मावळी पगडीसारखा असेल. गरवारे महाविद्यालय व त्या आधीच्या स्थानकांना मेट्रोचाच आकार आहे. पिंपरी चिंचवडमधील स्थानकांना ऊद्योगनगरीची चाके असतील तर बालगंधर्व जवळचा तारांचा पूल देवी सरस्वतीच्या विणेच्या आकाराचा असेल. याशिवाय पुण्यातील वैशिष्ट्यपूर्ण थोर ऐतिहासिक व्यक्तींचे चित्रदर्शनही त्या त्या स्थानकांमधून होणार आहे.
स्थानकातून ऊतरल्यावर किंवा येताना
स्थानकाच्या बरोबर खालील जागेत बस बे, रिक्षा थांबे असतील. याशिवाय तरूणांसाठी सायकलींचीही माफक शुल्कात व्यवस्था असेल. प्रवाशांना स्थानकात चढण्याऊतरण्यासाठी साधा जिना, सरकता विद्यूत जिना अगदी व्रुद्ध प्रवाशांसाठी लिफ्टही आहे. स्थानकाच्या पहिल्या मजल्यावरून दुसऱ्या, मेट्रोचा फलाट असलेल्या मजल्यावर जाण्यासाठीही अशीच व्यवस्था आहे. दिव्यांगांसाठीही स्वतंत्र व्यवस्था आहे.
मेट्रोचा वेग
प्रतितास ९० किलोमीटर या वेगाने पळण्याची मेट्रोची क्षमता आहे. सुरूवातीचे काही महिने प्रतितास ४० किलोमीटर या वेगाने मेट्रो धावेल. ८०० ते ११२५ मीटरवर एक स्थानक अशी रचना आहे. प्रत्येक स्थानकावर किमान २० व कमाल ३० सेकंद गाडी थांबेल.
प्रवाशांची सुरक्षितता
महामेट्रोने याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सर्व गाड्यांमध्ये अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा आहे. प्रत्येक डब्यात एक टेलिफोन असेल. आणीबाणीच्या क्षणी तो लावला तर थेट स्थानक प्रमूख तसेच सुरक्षा व्यवस्थेबरोबर बोलता येईल. याशिवाय आग प्रतिबंधक व अन्य सुविधाही आहेतच.
प्रवासी क्षमता
३ डब्यांची एक गाडी असेल. तिची प्रवासी क्षमता ९४० आहे. त्यातील १९२ प्रवासी आसनस्थ तर ऊर्वरित ऊभे असतील. प्रवाशांच्या संख्येनूसार नंतर गाडी ६ डब्यांची होईल. स्थानकांचे फलाट आताच या आकारात ( १४० मीटर लांब २१ मीटर रूंद) बांधण्यात आले आहेत. गाड्यांची वारंवारिताही (फ्रिक्वेन्सी ) प्रवाशांच्या संख्येवर कमीजास्त होईल.
असे असतील मेट्रोच तिकीट दर
पहिल्या २ किलोमीटरला- १० रूपये
२ ते ४ किमी- २०
४ ते १२ किमी- ३०
१२ ते १८ किमी- ४०
मेट्रो सुरू झाल्यानंतर पहिले वर्ष हेच दर कायम असतील. त्यात वाढ करता येणार नाही.