Pune: विसर्जनादिवशी पुणे मेट्रोची सेवा २४ तास सुरू राहणार; गणेशभक्तांना रात्रभर फिरता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 12:53 PM2024-09-09T12:53:31+5:302024-09-09T12:54:25+5:30
विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता मेट्रो सेवा सुरू होणार असून, दुसऱ्या दिवशी (१८ सप्टेंबर) सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू असेल
पुणे : पुण्यातही गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते आहे. दरवर्षी गणेशोत्सवात गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून तसेच जिल्ह्यातून लाखो भक्त गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी येतात. गणेशभक्तांसाठी पुणे मेट्रोने खास सोय केली आहे. विसर्जनादिवशी पुणे मेट्रोची सेवा ही २४ तास सुरू राहणार आहे. यामुळे पुणेकरांना रात्रभर गणपती बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे.
पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा देशभरातील आकर्षण आहे. पुण्यातील मानाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविक लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. रात्रीच्या वेळेस दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या भक्तांसाठी पुणे मेट्रोने मोठा दिलासा दिला आहे.
पुणे मेट्रो गणेशोत्सव काळात पहिल्या तीन दिवसांमध्ये (७, ८, ९ सप्टेंबर) सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ११ वाजेपर्यंत धावणार आहे. त्यानंतर उत्सवाचे पुढचे दिवस मेट्रो सेवा सकाळी ६ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू असणार आहे, तर विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता मेट्रो सेवा सुरू होणार असून, दुसऱ्या दिवशी (१८ सप्टेंबर) सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू असणार आहे.
प्रवाशांच्या सोईनुसार मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार असून सलग २४ तास पुणे मेट्रो धावणार आहे. त्यानंतर १८ सप्टेंबरला नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे मेट्रो धावणार आहे.