Pune Metro: शहराच्या धमन्या रूंदावून धावते महामेट्रो.., पुण्यातील तरुणाचं गाजतंय मेट्रोगीत, पहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 06:32 PM2022-03-16T18:32:12+5:302022-03-16T18:32:24+5:30
’मेट्रोगीत’ सध्या सर्वत्र व्हायरल झाले असून, या गीतावर पुणेकरांसह नेटिझन्सच्याही लाईक्सचा वर्षाव होत आहे
पुणे : आकांक्षांच्या अवकाशातील इंद्रधनू साकारते
शहराच्या धमन्या रूंदावून महामेट्रो धावते
हे अंत्रगतीचे स्तंभ तोलती
सांधत जाती दुवे नवयुग निर्माणाचे..
हे ’मेट्रोगीत’ सध्या सर्वत्र व्हायरल झाले असून, या गीतावर पुणेकरांसह नेटिझन्सच्याही लाईक्सचा वर्षाव होत आहे. शहरात ’मेट्रो’अन सोशल मीडियावर ‘मेट्रोगीत’ चीच चर्चा ऐकायला मिळत आहे. पुण्यातील प्रांजल अक्कलकोटकर या तरूणाने गायन, लेखन आणि संगीत अशी तिहेरी जबाबदारी लीलया पार पाडत ‘महामेट्रोला’ गीताद्वारे घराघरात पोहोचविण्यात खारीचा वाटा उचलला आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, मेट्रोमध्ये आणि स्थानकावर प्री लॉंच चित्रीकरण झालेले हे पहिले गाणे आहे. जेव्हा आपण मेट्रोमधून जात असतो तेव्हा ज्या गतीने नजरेसमोरून प्रतिमा सरकत असतात. त्याच्या रिदमचा मीटर त्यापद्धतीने सेट करण्यात आला आहे. मेट्रोमध्ये जर हे गाणे ऐकले तर ते मेट्रोच्या बिटबरोबर सिंक करण्यात आल्याने एक मस्त अनुभव मिळतो. याशिवाय मेट्रोचा हॉर्न गाण्याच्या स्केलमध्ये आणून बरोबर त्याचा बिटमध्ये उपयोग करण्यात आला आहे.
या ‘मेट्रोगीता’ विषयी सांगताना प्रांजल म्हणाला, ज्यावेळी मेट्रोचे पिलर्स पडत होते. तेव्हा तिथून जात असताना या गीताची संकल्पना सुचली. आपल्या डोक्यावर जणू इंद्रधनुष्य साकार होतंय असं वाटलं आणि ‘आकांक्षांच्या अवकाशातील इंद्रधनू साकारते’’ हे शब्द सुचले आणि गाणे साकार झाले. दोन वर्षांपूर्वीच हे गाणं लिहून तयार होतं. लॉकडाऊनपूर्वी मेट्रोचं काम अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले होते. त्यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना हे गाणं दाखविलं होतं. तेव्हा उदघाटनाच्या टप्प्यात आलं की गाणं करू म्हटले. पण त्यानंतर लॉकडाऊनचं लागलं. मेट्रोच्या उदघाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते.
पुण्यातील तरुणाचं गाजतंय मेट्रोगीत #PuneMetro#SONGpic.twitter.com/dX5X5v9Ec2
— Lokmat (@lokmat) March 16, 2022
तेव्हा दीक्षित यांना दूरध्वनी करून पुन्हा विचारणा केली. तेव्हा रोटरी क्ल्ब ऑफ लोकमान्यनगरला को-ब्रँडिगचे अधिकार दिले आहेत. त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनाही गाणं खूप आवडलं. आम्ही नागरी पुढाकारातून मेट्रोसाठी काहीतरी समर्पित करणार आहोत .तेव्हा या गाण्याचं व्हिडिओ शुटिंग करण्याचा प्रस्ताव त्यांनी समोर ठेवला आणि महामेट्रो व रोटरी क्लबने मेट्रो स्थानकावर शुटिंगसाठी परवानगी दिली. 10 जानेवारीला या गाण्याचे चित्रीकरण झाले. आज महामेट्रोच्या कार्यक्रमांमध्ये हे गाणे वाजविण्यात येत आहे. तसेच स्थानकावर जे टीव्ही लावण्यात आले आहेत, तिथेही हे गाणे दाखविले जात आहे. दोन आठवड्यात या गाण्याला साडेचार हजार व्ह्यूज मिळाले आहेत. रोटरीच्या इंंस्ट्राग्रामवर देखील गीताला असंख्य लाईक्स मिळाले आहेत.