Pune Metro: आली मेट्रो विद्येच्या माहेरी, स्मार्ट पुणे देशात होईल भारी; निवृत्त मुख्याध्यापकाची मेट्रोवर सुंदर कविता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 03:24 PM2024-10-13T15:24:37+5:302024-10-13T15:25:23+5:30
व्यवसाय असो किंवा असो दूर - दूरची नोकरी, तत्पर सेवेसाठी मेट्रो आली दारी!
पुणे: पुण्यात मेट्रोचं जाळ हळूहळू वाढत चाललं आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. अनेकांना प्रवास सुखकर अन् सोयीचाही वाटू लागला आहे. मेट्रोने वेळ वाचण्याबरोबरच प्रवासही अल्प दरात होतोय अशी नागरिकांनी प्रतिक्रिया दिली आहे. मध्यवर्ती भागात सुरु झालेल्या भुयारी मेट्रोतून तर लाखो नागरिकांनी प्रवास केल्याचे दिसून आले आहे. अशातच निवृत्त मुख्याध्यापक बाळकृष्ण मुरलीधर बाचल यांनी मेट्रोवर एक सुंदर कविता लिहिली आहे. आली मेट्रो विद्येच्या माहेरी, स्मार्ट पुणे आपले देशात होईल भारी असा मेट्रोचे कौतुक करणारा उल्लेख त्यांनी कवितेतून केला आहे.
पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, रोंजदारी, शिक्षण व्यवस्था या गोष्टींमुळे पुणे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यातच पुण्यात वाहनांचे प्रमाणही वाढले आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने मेट्रो सुविधा सुरु केली. आता लोकांना मेट्रो प्रवास सुखकर वाटू लागल्याचे मेट्रोच्या कमाईवरून दिसून आले आहे. अशातच बाचल यांची कविता चर्चेचा विषय ठरत आहे.
पुणे मेट्रो
व्यवसाय असो किंवा असो दूर - दूरची नोकरी,
तत्पर सेवेसाठी मेट्रो आली दारी!
प्रवासाचे सुख आणि सुखाचा प्रवास,
सर्वांसाठीच आहे पुणे मेट्रो खास!
वाहतुकीच्या कोंडीवर नक्की होणार मात
मेट्रोचा सुखद प्रवास सगळ्यांनाच स्वस्तात!
गती तर हवीच हवी,
प्रगती सुद्धा हवी!
नव्या तंत्रज्ञानाची माहिती होत राहावी,
आली हि मेट्रो दारी विद्येच्या माहेरी
स्मार्ट पुणे आपले देशात होईल भारी...!