पुणे मेट्रोच्या फेऱ्या वाढल्या मात्र काम अद्यपी अपूरेच; स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट भूयारी मार्ग बंदच
By राजू इनामदार | Published: January 1, 2024 06:09 PM2024-01-01T18:09:43+5:302024-01-01T18:10:17+5:30
महामेट्रोच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मार्गाचे काम सुरू होऊन आता ३ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला
पुणे: महामेट्रोने वनाज ते रूबी हॉल व पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट या मार्गावरील फेऱ्यांच्या संख्येत नववर्षापासून वाढ केली आहे. मात्र या नव्या वर्षातही मेट्रोचे काम अजून अपुरेच आहे. स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट हा भूयारी मार्ग अजून सुरू झालेला नाही. रूबी हॉल ते रामवाडी हा उन्नत मार्गही बंदच आहे. संपूर्ण मेट्रो सुरू होणार तरी कधी असा प्रश्न आता महामेट्रोच्या प्रवाशांकडून विचारला जात आहे.
महामेट्रोच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन्ही मार्गाचे काम सुरू होऊन आता ३ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. कोरोनाचा मध्यंतरीचा ६ ते ८ महिन्यांचा कालावधी वगळता सातत्याने हे काम सुरू आहे. दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (सर्वप्रथम वनाज ते गरवारे महाविद्यालया व त्यानंतर गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल) हस्ते या मार्गांचे लोकार्पण करण्यात आले. तेही घाईतच झाले. त्यावेळीही स्थानकांची कामे अपूर्णच होती. आताही संपूर्ण मार्ग सुरूच झालेला नाही. आहे त्याच मार्गावरच्या फेऱ्या महामेट्रोने नवीन वर्षांच्या निमित्ताने वाढवल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिका क्रमांक १ व वनाज ते रामवाडी या मार्गिका क्रमांक २ वर मिळून एकूण २४ किलोमीटर मार्गावर सध्या मेट्रोची सेवा सुरू आहे. प्रत्यक्षात हे दोन्ही मार्ग साधारण ३१ किलोमीटरचे आहेत. सध्या वनाज पासूनची मेट्रो रुबी हॉलजवळ संपते पिंपरी चिंचवडची सिव्हिल कोर्ट स्थानकाजवळ. सिव्हिल कोर्ट स्थानकापासूनचा स्वारगेटपर्यंतचा मेट्रो मार्ग बंद आहे. तसाच रूबी हॉलपासूनचा रामवाडीपर्यंत बंद आहे. या मार्गाची ९० टक्क्यांच्या वर कामे पूर्ण झाली आहेत असे महामेट्रोकडून सांगण्यात येते, मात्र स्थानकांची कामे अजूनही अपूर्ण आहेत.
तरीही महामेट्रोने सध्या सुरू असलेल्या दोन्ही मार्गावरच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. या आधी दिवसभरात दोन्ही मार्गावर प्रत्येकी ८१ फेऱ्या होत होत्या. आता त्यात वाढ करण्यात आली असून १४१ फेऱ्या होतील. साधारण दर १० मिनिटांच्या अंतराने मेट्रो उपलब्ध होईल असे महामेट्रोने कळवले आहे. मेट्रोला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्यामुळेच ही वाढ कऱ्ण्यात आली आहे, मात्र प्रवाशांकडून आता उर्वरित मार्ग कधी सुरू होणार, मेट्रो स्थानकांजवळ गाडी लावता येत नाही, फिडर सेवा ( मेट्रो स्थानकांजवळ अणून सोडणारी रिक्षा, पीएमपीएल वगैरे) कधी सुरू होणार असे प्रश्न विचारले जात आहेत.
रुबी हॉल ते रामवाडी या मार्गाचे काम ९८ टक्के झाले आहेत. साधारण फेब्रुवारीमध्ये रेल्वेसुरक्षा आयुक्तालयाकडून या मार्गाची तपासणी केली जाईल. त्यांच्याकडून हिरवा कंदिल मिळताच हा मार्गही सुरू होईल. स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट हा भूयारी मार्गही मंडई जवळ असणाऱ्या भूयारी स्थानकात तेथील गर्दमुळे अनेक अडथळे येत असल्याने लांबला होता. मात्र तिथेही आता सर्व अडचणी दूर झाल्या असून ९० टक्के काम झाले आहे. एप्रिल २०२४ मध्ये याही मार्गाचे रेल्वे सुरक्षा आयुक्तांलयाकडून इन्स्पेक्शन होईल व हा मार्गही सुरू होईल.- हेमंत सोनवणे, संचालक, जनसंपर्क महामेट्रो