Pune Metro | पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! हडपसर-पुलगेट भागातही धावणार मेट्रो!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 09:15 AM2022-06-27T09:15:04+5:302022-06-27T09:20:02+5:30
हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणीकाळभोरपर्यंत करण्याचा निर्णय देखील पीएमआरडीएने घेतला...
पुणे :पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी मार्च महिन्यात वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी ते फुगेवाडी ही मेट्रो सुरू करण्यात आली. उर्वरीत मार्गाचे काम महामेट्रो करत आहे. आता हडपसर, पुलगेट भागात देखील मेट्रोच्या कामाला सुरुवात होणार असून, लवकरच या भागातही मेट्राे धावणार आहे. महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांनी ही माहिती दिली.
महामेट्रो आणि ‘पीएमआरडीए’कडून ४३ किमी लांबीच्या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. खडकवासला ते स्वारगेट, स्वारगेट ते रेसकोर्स आणि हडपसर ते सासवड या मार्गाचा यात समावेश करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोचे काम सध्या सुरू असून हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे काम पीएमआरडीएतर्फे सुरू आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग लोणीकाळभोरपर्यंत करण्याचा निर्णय देखील पीएमआरडीएने घेतला आहे. खडकवासला ते खराडी या मार्गावर देखील मेट्रो सुरू होणार आहे. शिवाजीनगर, पुलगेट, हडपसर आणि लोणी काळभोर तर एक फाटा सासवड रोडवर असल्याचे विस्तारित मेट्रोमध्ये नियोजन करण्यात आले आहे.
आमचा आराखडा बनून तयार आहे. फक्त या मेट्रोचे काम पीपीपी (सार्वजनिक आणि खासगी भागीदारी) तत्त्वावर करायचे की महामेट्रो हे अद्याप ठरलेले नाही. लवकरच यावर निर्णय होईल.
- हेमंत सोनवणे, संचालक, जनसंपर्क, महामेट्रो