पुणे मेट्रोचं आता मोदींच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन होणार?; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये खलबतं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 15:04 IST2024-09-26T15:02:31+5:302024-09-26T15:04:53+5:30
मेट्रो मार्गाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे मेट्रोचं आता मोदींच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन होणार?; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये खलबतं
Pune Metro ( Marathi News ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणेमेट्रोच्या स्वारगेट ते मंडई या भुयारी मार्गाचे लोकार्पण होणार होते. मात्र शहरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा आजचा दौरा रद्द करण्यात आला. त्यामुळे या मेट्रो मार्गाचे उद्घाटन लांबणीवर पडणार का, अशी चर्चा सुरू असतानाच आता ऑनलाइन उद्घाटनासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे गणेश क्रीडा कला रंगमंचमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे समजते. कारण स्वारगेट ते मंडई या मार्गावरील मेट्रो मागील काही दिवसांपासून तयार असून केवळ उद्घाटन कार्यक्रमामुळे लोकार्पण रखडले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करून लोकांसाठी ही सेवा उपलब्ध केली जाऊ शकते.
दरम्यान, गणेशोत्सव काळातच पुण्यातील या मेट्रो मार्गाचे उद्घाटन होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या कार्यक्रमासाठी २६ सप्टेंबर ही वेळ देण्यात आली होती. परंतु आता पावसामुळे मोदींचा पुणे दौरा रद्द झाला आहे.
मेट्रो प्रशासनाने नागरिकांना काय आवाहन केलं?
उद्घाटन समारंभ रद्द झाल्याने जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक ही सेवा कार्यान्वित नसल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले आहे. मेट्रो प्रवासी सेवेत आज जे इतर बदल करण्यात आले होते ते रद्द करण्यात आले असून इतर मार्गावरील मेट्रो सेवा नियमितपणे सुरु राहील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.