पुणे मेट्रो रात्री अकरा वाजेपर्यंत धावणार; मेट्रो प्रशासन लवकरच निर्णय घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 14:08 IST2025-01-11T14:07:20+5:302025-01-11T14:08:04+5:30
सध्या मेट्रो सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत धावत असून शहरातील आयटी कंपन्या रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्यामुळे अनेकांना मेट्रोने प्रवास करता येत नाही.

पुणे मेट्रो रात्री अकरा वाजेपर्यंत धावणार; मेट्रो प्रशासन लवकरच निर्णय घेणार
पिंपरी : प्रवाशांच्या मागणीनुसार आता पुणेमेट्रो रात्री अकरा वाजेपर्यंत चालविण्यात येणार आहे. प्रशासन निर्णय घेण्याच्या तयारीत असून, लवकरच याची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पुणेमेट्रोचा पिंपरी ते स्वारगेट (१७.५ किलोमीटर, १४ स्थानके) आणि वनाझ ते रामवाडी (१४.५ किलोमीटर, १६ स्थानके) असा दोन्ही मिळून ३३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. या दोन्ही मार्गांवर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत असून, दैनंदिन प्रवासी संख्या दीड लाखावर गेली आहे. सध्या मेट्रो सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत धावत आहे; पण पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील आयटी कंपन्या, आस्थापना रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्यामुळे अनेकांना मेट्रोने प्रवास करता येत नाही.
पीएमपी किंवा खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो. खासगी वाहनचालक प्रवाशांची लूट करतात. त्यामुळे मेट्रो रात्री ११ वाजेपर्यंत चालविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. मेट्रो प्रशासन प्रवाशांच्या या मागणीचा सकारात्मक विचार करणार असून, आता रात्री ११ वाजेपर्यंत मेट्रो चालविण्याचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा मिळणार आहे.
मेट्रो रात्री ११ वाजेपर्यंत चालविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. प्रवाशांच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात आला असून, हा निर्णय प्रशासनाच्या विचाराधीन आहे. - हेमंत सोनावणे, जनसंपर्क अधिकारी, मेट्रो