अनधिकृत बांधकामधारक रडारवर; पीएमआरडीएतर्फे दोन गुन्हे दाखल

By नारायण बडगुजर | Updated: November 30, 2024 12:17 IST2024-11-30T12:16:58+5:302024-11-30T12:17:11+5:30

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. अशा बांधकामांना नोटीस देऊन गुन्हे ...

Pune Metropolitan Region Development Authority takes action against unauthorized constructions | अनधिकृत बांधकामधारक रडारवर; पीएमआरडीएतर्फे दोन गुन्हे दाखल

अनधिकृत बांधकामधारक रडारवर; पीएमआरडीएतर्फे दोन गुन्हे दाखल

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. अशा बांधकामांना नोटीस देऊन गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. यात मावळ तालुक्यातील दोन बांधकामधारकांवर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहे.

पीएमआरडीएचे कनिष्ठ अभियंता गणेश जाधव यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २९) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. इंदाराम चौधरी आणि दीपक कुमार सहानी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व रस्ता नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ५४ चे पोट कलम २ प्रमाणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदाराम चौधरी आणि दीपक सहानी यांनी गहुंजे येथे गट क्रमांक १९८ मध्ये अनधिकृत बांधकाम सुरू केले. इंदाराम चौधरी याने ३० बाय ८० फुटामध्ये चार मजली ९६०० चौरस फूट अनधिकृत बांधकाम केले. तसेच दीपक सहानी याने बांधकाम चालू ठेवून त्यामध्ये २० बाय ४० फूट असे एकूण ५६०० चौरस फूट चार मजली अनधिकृत बांधकाम केले. हा प्रकार फेब्रुवारी २०२४ मध्ये पीएमआरडीए प्रशासनाच्या निदर्शनास आला. त्यानंतर पीएमआरडीएतर्फे इंदाराम चौधरी आणि दीपक सहानी यांना नोटीस देण्यात आली.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व रस्ता नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ५४ चे पोट कलम २ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली. मात्र, नोटीसचे अनुपालन न करता इंदाराम चौधरी आणि दीपक सहानी यांनी बांधकाम चालू ठेवले. त्यामुळे पीएमआरडीए प्रशासनातर्फे याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.

Web Title: Pune Metropolitan Region Development Authority takes action against unauthorized constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.