Pune Mini Lockdown : संचारबंदीची भीती; बेरोजगारीचे संकट; हॉटेलमधील कर्मचारी थेट आपलं गाव गाठणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 12:15 AM2021-04-04T00:15:43+5:302021-04-04T00:16:30+5:30
या परप्रांतीय कामगारांना मागच्यावेळी गाव गाठण्यासाठी चक्क प्रत्येकी वीस हजार रुपये मोजावे लागले. त्यामुळे आता निघावं की थांबावं या द्विधा मनस्थितीत ते अडकले आहेत.
प्राची कुलकर्णी-
पुणे: पुणे शहरात प्रशासनाने शनिवारपासून जमावबंदी आणि संचारबंदी जाहीर केली आहे.तसेच हॉटेल व रेस्टॉरंट ७ दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यामुळे हॉटेल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे मोठे संकट ओढवले असून ते गावी परतण्याच्या तयारीत आहे.
पुणे शहरात हॉटेल आणि रेस्टॉरंटची प्रचंड संख्या आहे. तसेच त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.त्यामुळे निश्चितपणे प्रशासनाने जाहीर केलेल्या निर्णयामुळे आधीच मागच्या वर्षी अडचणीत आलेल्या या कर्मचाऱ्यांवर आता पुढे काय हा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे शहरातले हॉटेलमधले कर्मचारी पुन्हा एकदा गावाकडे जायला निघण्याच्या तयारीत दिसत आहेत. काहीही केलं तरी मागच्या वेळसारखी परिस्थिती येऊ द्यायची नाही अशीच खुणगाठ त्यांनी बांधली आहे.
उत्तराखंडचे रमेश शर्मा ( नाव बदलले आहे) पुण्यातल्या एका हॅाटेलात स्वयंपाकी म्हणून काम करतात गेल्या लॅाकडाउन मध्ये परवानगी मिळत नाही म्हणून काही दिवस शहरात राहीले. पण त्याचा फटका इतका की गावी जायला त्यांना प्रत्येक वीस हजार रुपये मोजावे लागले. त्यामुळे आता निघावं की थांबावं या द्विधा मनस्थितीत ते अडकले आहेत.
शर्मा म्हणाले ,” मागच्या संचारबंदीला हॉटेलकडून जेवढी होईल तेवढी मदत झाली होती. त्यानंतर संचारबंदीचे अजून दिवस १५ वाढवण्यात आले. मग आम्ही आमच्या गावी गेलो. कोणाचीही मदत न घेता प्रवासाला स्वतः खर्च केला. सरकारने तेव्हपासून आतापर्यंत कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. रेस्टोरंट बंद असले तरी ते आमच्या राहण्याची आणि खाण्याची सोय ते करत आहेत. सरकार आमच्यासाठी काहींचं करत नाहीत. त्यातून त्यांनी संचारबंदी लागू करून ठेवली आहे. आम्ही परराज्यातून स्वतःच्या परिवारासहित या ठिकाणी आलो आहोत. या संचारबंदीत किराणा माल, भाजीपाला सर्व गोष्टींची दुकाने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मग हॉटेल आणि रेस्टोरंट यांच्यावर का बंदी आणण्यात आली आहे."
या परिस्थितीत उत्पन्न थांबलं आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी हॅाटेल हेच त्यांचं घर बनले आहे. शिल्लक धान्यसाठा त्यांना शिधा पुरवतोय. पण हे किती दिवस चालणार हा प्रश्न त्यांना भेडसावतोय. पुढे काय याचे उत्तर त्यांना मिळायला तयार नाही.
एक कर्मचारी म्हणाला ,” पुण्यात सात दिवसांसाठी हॉटेल आणि रेस्टोरंट बंद करण्यात आले आहेत. मागच्या वेळी प्रमाणे ही संचारबंदी वाढत जाण्याची आम्हाला भीती वाटू लागली आहे. मी घरात एकटा कमवता आहे. दर महिन्याला घरभाडे भरण्याची जबाबदारी माझ्यावरच असते. हॉटेलने राहण्याची सोय करून दिली आहे. त्यामुळे आम्ही इथेच राहत आहोत. घरी जाऊन कुटुंबियांना कुठं त्रास देणार म्हणून पर्याय नसल्याने येथे राहावे लागत आहे.” अर्थात परत फिरणे सोपे नाही याची जाणीवसुद्धा त्यांना आहे.
वेटरचे काम करणाऱ्या सुग्रीव म्हणाला, आम्हाला आता पुन्हा घरी जावे लागते की काय अशी भीती वाटू लागली आहे. संचारबंदी हा उपाय नाही. त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या हॉटेल व्यवसायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सद्यस्थितीत हॉटेलमधून आम्हाला सहकार्य होत आहे. आमचे पगार अजूनही थांबवले नाहीत. त्याचप्रमाणे राहण्याची सोय करण्यात आली आहे.