पुणे : लग्नाचं आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवलं व केला बलात्कार, कोर्टानं फेटाळला तरुणाचा जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 02:17 PM2017-10-09T14:17:01+5:302017-10-09T14:18:33+5:30
लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेलं व तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सकलेन जलाल मुल्ला या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पुणे - लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेलं व तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सकलेन जलाल मुल्ला या तरुणाच्या मुसक्या आवळल्या आहेत. शिवाय, त्याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोणे यांनी फेटाळला.
याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलिसात फिर्याद दिली. सकलेन याने पीडित मुलीला लग्नाचे आमीष दाखवले. तिला 20 ऑगस्ट रोजी कोंढवा भागातून पळवून कात्रज परिसरात नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सकलेन याला अटक केली असून सध्या त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता पण या अर्जास अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला.
उपलब्ध पुराव्यांवरून प्रथमदर्शनी सकलेन याने हा गुन्हा केल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. पीडित मुलीचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यासमोर जबाब नोंदविण्यात आलेला नाही. जामीन मिळाल्यास आरोपी साक्षीदारांवर दबाव आणण्याची आणि पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्यता आहे. यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, असा अॅड. बोंबटकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सकलेन याचा जामीन फेटाळला.