पुण्यातील माय-लेकरांच्या 'गुड मॉम' स्टार्टअपचे पंतप्रधानांकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 12:03 PM2022-11-17T12:03:37+5:302022-11-17T12:03:50+5:30
‘बेसिलिया ऑरगॅनिक्स’मधून आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार भरड धान्याचा प्रचार
पुणे : शर्मिला ओसवाल आणि त्यांचा मुलगा शुभम या पुण्यातील माय-लेकराच्या ‘बेसिलिया ऑरगॅनिक्स’ या स्टार्टअपने गुड मॉम नावाने भरड धान्यासह सेंद्रिय धान्याचे उत्पादन सुरू केले आहे. पोषक अशा या भरड धान्याच्या उत्पादनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले असून, २०२३ या आंतरराष्ट्रीय पोषक अन्नधान्य वर्षानिमित्त जागतिक स्तरावर पोषक अन्नधान्याच्या प्रचारासाठी या स्टार्टअपची निवड केली आहे.
बेसिलिया ऑरगॅनिक्सच्या गुड मॉम उत्पादनाला कृषी मंत्रालयाच्या आयआयएमआर-आयसीएआर न्यूट्रीहबच्या वतीने सर्वोत्तम स्टार्टअप म्हणून गौरवण्यात आले. त्यानंतर भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयएआरआय्) दिल्ली येथील पुसा मेळा मैदानावर झालेल्या ‘पीएम किसान सम्मान सम्मेलन २०२२’ प्रदर्शनासाठी पुण्यातील या माय-लेकराच्या स्टार्टअपची निवड झाली. या प्रदर्शनाला पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली आणि पाच स्टार्टअप्सशी संवाद साधला. त्यामध्ये बेसिलिया ऑरगॅनिक्सचा समावेश होता. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर उपस्थित होते.
या प्रदर्शनात १५०० पेक्षा जास्त कृषी स्टार्ट अप सहभागी होते. यातील शर्मिला ओसवाल आणि शुभम ओसवाल यांच्या स्टार्टअपचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक करण्यात आले. ओसवाल माय-लेकराच्या नेतृत्वाखाली बेसिलिया ऑरगॅनिक्सच्या माध्यमातून ज्वारी, बाजरी, नाचणी, आदी सेंद्रिय धान्याचे उत्पादन करण्यात येते. हे दोघेही सामाजिक उद्योजक आहेत. जे पौष्टिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी तसेच देशाच्या आरोग्य, सामाजिक कार्यक्रमास मदत करतात. हा स्टार्टअप सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या स्टार्टअप संस्थांपैकी एक असल्याचे अधोरेखित झाले.
ग्राहकांबरोबरच उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा चांगला फायदा व्हावा हा उद्देश
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुकाची थाप टाकल्याने आमची जबाबदारी वाढली आहे. सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पोषक अन्नधान्य वर्ष म्हणून साजरे होत आहे. त्यानिमित्त जागतिक स्तरावर आपल्या पोषक धान्य असलेल्या भरड धान्याचा प्रचार करण्याची जबाबदारी आमच्यावर राहणार आहे. हे सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले अन्नधान्य देशासह जगातील नागरिकांना मिळण्याची आवश्यकता आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते खूप महत्त्वाचे झाले आहे. त्यातूनच आम्ही हा स्टार्ट सुरू केला असून, येणाऱ्या काळात त्याची व्याप्ती वाढविली जाणार आहे. ग्राहकांबरोबरच उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचा चांगला फायदा व्हावा हा उद्देश आहे. - शुभम व शर्मिला ओसवाल (बेसिलिया ऑरगॅनिक्स)