पंधरवड्याला रक्त भरून ‘ती’ देतेय मुलाला नवसंजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 02:54 AM2018-05-09T02:54:22+5:302018-05-09T02:54:22+5:30
पती सांभाळ करीत नसल्याने वडिलांच्या घरीच राहून मोलमजुरी करून कसाबसा ती आपल्या दोन मुलांचा उदरनिर्वाह करीत होती. ते करणाऱ्या आईच्या घरात अठराविश्वे दारिद्र्य असताना छोट्या मुलाला थॅलेसेमिया या दुर्धर आजाराने ग्रासले.
तळेगाव ढमढेरे : पती सांभाळ करीत नसल्याने वडिलांच्या घरीच राहून मोलमजुरी करून कसाबसा ती आपल्या दोन मुलांचा उदरनिर्वाह करीत होती. ते करणाऱ्या आईच्या घरात अठराविश्वे दारिद्र्य असताना छोट्या मुलाला थॅलेसेमिया या दुर्धर आजाराने ग्रासले. मोलमजुरीतून १२० रूपये मिळतात, त्यात घरात चूल पेटवायची की मुलाला नवसंजीवनी देण्यासाठी उपचारासाठी खर्च करायचे... ‘ती’ची ही धडपड विठ्ठलवाडी येथे कार्यक्रमाच्यानिमित्ताने समोर आली आणि पाच मिनिटांत १० हजार रुपये जमा झाले... मात्र तिचे प्रश्न तसेच कायम आहेत.
शिरूर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे नीता सचित लोंढे ही युवती नवरा सांभाळत नसल्याने वडील रावसाहेब म्हस्के यांच्याकडेच राहत आहे. गवत कापण्याचे मोलमजुरीचे काम करून दोन मुलांना शिक्षण देत सांभाळ करीत आहे. सम्यक लोंढे इयत्ता चौथीमध्ये व दुसरा आर्यन लोंढे इयत्ता तिसरीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विठ्ठलवाडी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत.
आर्यन दीड वर्षाचा असताना त्यास थॅलेसेमिया हा दुर्धर आजार समोर आला. वानवडी येथील कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पंधरवड्यात भरले जाणारे रक्त येथे विनामूल्य मिळू लागल्याने तिला मोठा आधार मिळाला, मात्र दर महिन्याला लागणाºया गोळ्या, औषधांसाठी ४ हजार रुपये खर्च ही माता मोलमजुरीच्या पैशातून आजपर्यंत भागवत आली आहे. या आजाराशी सामना करताना हे कुटुंब अक्षरश: हवालदिल झाले आहे.
आतापर्यंतचा खर्च तीने कसाबसा केला पण पुढील उपचाराचा प्रश्न उभा राहिला आहे. विठ्ठलवाडी येथे कार्यक्रमात तिची कहानी ऐकूण अवघ्या पाच मिनिटांत दहा हजार रुपयांची मदत ग्रामस्थांनी दिली. पण पुढे काय? हा प्रश्न तिच्यासमोर आहेच.
मी दररोज मोलमजुरी करून कुटुंबाचा खर्च कसाबसा भागवतेय. शस्त्रक्रियेसाठी येणारा दोन ते तीन लाख रुपये एवढा मोठा खर्च उभा करू शकत नाही. जर लोकवर्गणीतून पैसे उभे राहिल्यास माझ्या मुलाला नवसंजीवनी मिळेल.
- नीता लोंढे, माता