पुणे : पाणी प्रश्नासंदर्भातील खासदार अनिल शिरोळेेंचे उपोषण स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 09:04 AM2018-10-27T09:04:18+5:302018-10-27T09:04:31+5:30
लोकांच्या पाण्याच्या तक्रारीने हैराण झालेले खासदार अनिल शिरोळे यांनी महापौर आणि आयुक्तांबरोबरच्या बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर आज सकाळी उपोषण करण्याचा निर्णय स्थगित केला आहे.
पुणे : काही दिवसांपासून पुणे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. शिरोळे यांच्याकडे अनेक दिवसांपासून नागरिक तक्रारी करत होते. पाणी प्रश्नानं पुणेकर हैराण झाले आहेत. पुणे शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न तडीस लावण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून आपण बेमुदत उपोषणाला बसणार होतो, पण महापौर आणि आयुक्तांचा फोन आला. त्यांच्याबरोबर उद्या एकत्रित बैठक होणार असून हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आजपासून सुरु होणारे उपोषण आपण स्थगित करीत असल्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी सांगितले. शिरोळेदेखील पाणीपुरवठा अधिका-यांशी बोलत होते. परंतु, तरीही त्यामध्ये फारसा फरक पडला नाही.
शिरोळे म्हणाले, की पुणे शहरातील प्रभात रोड, भांडारकर रोड, मॉडेल कॉलनी यासारख्या मध्यवर्ती भागांमध्येसुद्धा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात हे आश्चर्यजनक आहे. पुणेकरांना पुरेसे पाणी मिळालेच पाहिजे. सध्यातरी असे चित्र शहरात दिसत नाही. प्रत्येक घरातील महिलेची पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने दयनीय अवस्था झालेली आहे. याबाबत मी पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्याशी फोनवरून बोललो. त्यांना पत्रही दिले. त्यांनी पुणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन फोनवरून मला दिले. महापौर मुक्ता टिळक यांच्याशीही चर्चा केली. मात्र, त्यानंतर पाण्याच्या तक्रारींबाबत वाढच झाली. आज तर त्याचा कहरच झाला. मॉडेल कॉलनी परिसरात शुक्रवारी सायंकाळी ६ ते १० हे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक होते. मात्र, आज तेथे पाणी आलेच नाही. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. महापालिका पाणीच देऊन शकणार नसेल तर उपयोग काय? अनेक महिला दररोज माझ्या कार्यालयात येऊन पाणी पुरवठ्याच्या तक्रारी करीत आहेत़ काल पाणी पुरवठ्याशी संबंधित सर्व अधिका-यांना फोन केले. पण एकानेही साधा फोनही उचलला नाही. त्यामुळे अखेर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता.
आपल्या या निर्णयाची माहिती मिळाल्यावर महापौर आणि आयुक्तांनी फोन करुन पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. त्याबाबत उद्या एकत्रित बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू असे त्यांनी सांगितले व उपोषण न करण्याची विनंती केल्याने आपण उपोषण स्थगित ठेवत असल्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी सांगितले.