पुणे-मुंबई अंतर २३ मिनिटांत कापणार... पण कधी ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 01:31 PM2019-07-31T13:31:32+5:302019-07-31T13:38:04+5:30
मुंबई ते पुणे अशा ११७.५० किलोमीटरच्या हायपरलूप या अत्याधुनिक परिवहन प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे.
- अभिजित कोळपे -
पुणे : मुंबई (बीकेसी) ते पुणे (वाकड)दरम्यानचे अंतर केवळ २३ मिनिटांत पार करता यावे, यासाठी ११७.५० किलोमीटरचा हायपरलूप हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प करण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णयदेखील झाला आहे. मात्र, मागील दोन वर्षांत या प्रकल्पाच्या घोषणेव्यतिरिक्त कोणतेही ठोस काम पुढे सरकले नसल्याची वस्तुस्थिती आहे. या प्रकल्पासाठी अपेक्षित भूसंपादन, लागणारा प्रस्तावित खर्च आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिलेला ६ ते ८ वर्षांचा कालावधी व सुरू असलेले काम यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास २० ते २५ वर्षांचा कालावधी लागू शकतो, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
............
मुंबई ते पुणे अशा ११७.५० किलोमीटरच्या हायपरलूप या अत्याधुनिक परिवहन प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. ताशी ४९६ किलोमीटर वेगाने केवळ २३ मिनिटांत हे अंतर पार करता येऊ शकते, असे निर्देशित करण्यात आले आहे. त्यासाठी तब्बल ७० हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक प्रस्तावित करण्यात आली असून, दोन टप्प्यांमध्ये कामाचे नियोजन केल्याचे सांगण्यात येत आहे.
पहिला टप्पा ११.८० किलोमीटरचा पथदर्शी प्रकल्प पीएमआरडीए राबविणार आहे. त्यासाठी ५ कोटींचा खर्च दाखवण्यात आला आहे. तर, दुसºया टप्प्यात मुंबई ते पुणे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे प्रस्तावित करण्यात
आले आहे. संपूर्ण प्रकल्प येत्या
६ ते ८ वर्षांच्या कालावधीत पूर्ण होणार, असेही प्रस्तावित करण्यात आले आहे.
पुणे-मुंबईदरम्यानच्या प्रवासाचा कालावधी अवघ्या २३ मिनिटांपर्यंत कमी करण्यासाठी ‘हायपरलूप’सारख्या अत्यंत वेगवान यंत्रणेची चाचपणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पायाभूत सुविधा प्राधिकरणाच्या (महाआयडिया) माध्यमातून ‘चाचणी ट्रॅक’ विकसित करून, त्यानंतर हा संपूर्ण प्रकल्प राबविण्याचा सरकारचा विचार आहे. हायपरलूप टेक्नॉलॉजीज आणि डीपी वर्ल्ड यांनी हा प्रकल्प उभारण्याची तयारी दाखवली असून, त्यानुसार ‘मूळ प्रकल्प सूचक’ म्हणून त्यांची शिफारस करण्याचा निर्णय गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला.
या संपूर्ण प्रकल्पाच्या जबाबदारीची हमी मूळ सूचकांकडून घेण्यात येणार आहे.
...........
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि पीएमआरडीएचे तत्कालीन आयुक्त किरण गित्ते यांनी सन २०१८मध्ये हायपरलूप या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी आमेरिकेचा दौरा केला होता.
मात्र, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प खुद्द आमेरिकेतही अजून प्रायोगिक पातळीवरच आहे.
तेथे अजूनही चाचणी घेण्यात येत आहे. भारतात हा प्रकल्प कधी यशस्वी होईल, अशी साशंकता तज्ज्ञांनी व्यक्त
केली आहे.
........
ठळक वैशिष्टये :
मुंबई (बीकेसी) ते पुणे (वाकड) ११७.५० किलोमीटर अंतर
२३ मिनिटांत प्रवासाचे उद्दिष्ट; ४९६ प्रतितास गती प्रस्तावित
७० हजार कोटींची परकीय गुंतवणूक होणार
दोन टप्प्यांमध्ये काम करण्याचे नियोजन
पहिला टप्पा ११.८० किलोमीटरचा पथदर्शी प्रकल्प
पहिला टप्पा दोन ते अडीच वर्षांत राबविणार; ५ हजार कोटींचा खर्च
दुसरा टप्पा : मुंबई ते पुणे प्रकल्पाची अंमलबजावणी
संपूर्ण प्रकल्प ६ ते ८ वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन
........