पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे : अतिवेगाला आवर घातल्याने घटले अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 06:43 AM2020-03-16T06:43:54+5:302020-03-16T06:44:10+5:30
तीन वर्षांत अपघातांची संख्या कमी झाली आहे. २०१७ मध्ये ३६० असणारी संख्या ३०६ पर्यंत खाली आली आहे. तर अमृतांजन पूल खंडाळा ते बोरजदरम्यान अपघातांची संख्या निम्म्याने घटली आहे.
- हणमंत पाटील/ विशाल विकारी
लोणावळा (पुणे) : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर पोलिसांनी अपघात रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे अपघातांचे
प्रमाण घटले आहे. तीन वर्षांत अपघातांची संख्या कमी झाली आहे. २०१७ मध्ये ३६० असणारी संख्या ३०६ पर्यंत खाली आली आहे. तर अमृतांजन पूल खंडाळा ते बोरजदरम्यान अपघातांची संख्या निम्म्याने घटली आहे.
पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या द्रुतगती महामागावर अपघाताचे प्रमाण वाढल्याने वेगाला आवर घालण्यासाठी महामार्ग पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली होती. तसेच अपघातांची ठिकाणे शोधून उपाययोजना केल्या होत्या. त्याचा परिणाम गेल्या तीन वर्षांत अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.
४७ हजार वाहनांवर कारवाई
वाहतुकीचे नियम मोडत वेगाने वाहने चालविणे, लेन कटिंग असे प्रकार करणाºया तब्बल ४७ हजार ४९३ वाहनांवर दोन वर्षांत खंडाळा महामार्ग पोलिसांनी कारवाई करत त्यांच्याकडून ६२ लाख ८० हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. २०१८ मध्ये द्रुतगती मार्गावर अमृतांजन पूल ते मळवली बोरजदरम्यान ५१ अपघात झाले होते. २०१९ मध्ये ही संख्या घटून ३२ झाली आहे. तर मागील दोन महिन्यांत केवळ एक अपघात झाला आहे.
वेगावर नियंत्रण महत्त्वाचे
सततची पेट्रोलिंग, वेगमर्यादा व लेन कटिंगचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईमुळे अपघातांचे प्रमाण घटले आहे.
वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवल्यास व लेन कटिंगचा मोह टाळल्यास अपघातांचे प्रमाण निश्चित मोठ्या प्रमाणात कमी होईल, असे खंडाळा महामार्गाचे सहायक
पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले यांनी सांगितले.
द्रुतगती महामार्गावरील अपघात कमी करण्यासंदर्भात २०१८ पासून उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यात दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू केल्याने वाहनांची वेग मर्यादा ताशी शंभरवर आणण्यात यश आले आहे. त्यामुळे भरधाव वेगामुळे अपघात कमी झाले आहे.
-मिलिंद मोहिते, पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा