PMC Budget | पाणी पुरवठा विभागाला सर्वाधिक महत्त्व; जाणून घ्या पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पातील तरतुदी

By निलेश राऊत | Published: March 24, 2023 04:37 PM2023-03-24T16:37:24+5:302023-03-24T16:39:25+5:30

पाणी पुरवठा विभागासाठी अर्थसंकल्पातील १३ टक्के रक्कम...

pune muncipal corporation budget PMC Budget Water supply sector is of utmost importance | PMC Budget | पाणी पुरवठा विभागाला सर्वाधिक महत्त्व; जाणून घ्या पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पातील तरतुदी

PMC Budget | पाणी पुरवठा विभागाला सर्वाधिक महत्त्व; जाणून घ्या पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पातील तरतुदी

googlenewsNext

पुणे : महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी सादर केलेल्या महापालिकेच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात सर्वाधिक महत्त्व पाणी पुरवठा विभागाला दिले असून, समान पाणी पुरवठा योजना या वर्षी पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला गेला आहे. पाणी पुरवठा विभागासाठी ९ हजार ५१५ च्या अर्थसंकल्पापैकी १३ टक्के रक्कम म्हणजेच १ हजार ३२१ कोटी ६७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये भांडवली तरतूद ५३५ कोटी ३० लाख तर महसुली तरतूद ७८६ कोटी ३७ लाख रुपयांची आहे. विभागनिहाय तरतूदी पुढीलप्रमाणे-

पाणीपुरवठा :

समान पाणीपुरवठा योजना राबविताना कोरोना आपत्तीमुळे मोठा विलंब झाला. हे लांबलेले काम सन २०२३-२४ मध्ये पूर्णत्व:कडे नेताना शहराला समान पाणीपुरवठा करण्यासाठी मार्च, २०२४ अखेर १४१ झोन पैकी ८५ झोन कार्यान्वित करण्यात येणार आहेत. याचबरोबर सुमारे ३५० किलो मीटर लांबीची नवीन वितरण व्यवस्था विकसित करण्यात येणार असून, या वर्षात अंदाज दीड लाख पाणी मीटर बसविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याचबरोबर सर्व पाणीपुरवठा शुध्दीकरण केंद्र, टाक्या व पंपिंग स्टेशन येथे इलेक्ट्रॉनिक बल्क फ्लो मीटर बसविण्यात येणार असून, याद्वारे पाण्याचे ऑडिट करण्यात येणार आहे.

शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये समान पाणीपुरवठा राबविण्यासाठी कन्सल्टंटची नेमणूक करण्यात आली असून, या योजनेचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात बावधन ब्रद्रुक, सुस व म्हाळुंगे काम हाती घेण्यात येणार आहे. सदर गावांपैकी बावधन बु. येथे ५ टक्यांचे बांधकाम व सुमारे ३५ किलोमीटर पाण्याची लाईन टाकण्यात येणार आहे. तसेच सुस व म्हाळुंगे येथे ६ टाक्यांचे बांधकाम व ७७ किलोमीटर पाण्याची लाईन विकसित करण्यात येणार आहे.

मलनि:सारण विभाग (ड्रेनेज) :

मलनि:सारण देखभाल दुरूस्ती विभागासाठी अर्थसंकल्पात ८१२ कोटी ७१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये भांडवली तरतूद ४७९ कोटी ९५ लाख तर महसुली तरतूद ३३२ कोटी ७६ लाख रुपयांची आहे. या विभागाद्वारे मार्फत विविध व्यासाच्या मलवाहिन्या बदण्यासाठी १७७ कोटी २० लाख तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे शहरातील ८६ किलोमीटर लांबीच्या विविध व्यासाच्या मलवाहिन्यांचे काम होणार आहे. महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ड्रेनेज लाईन विकसित करण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर पावसाळी लाईन, नाले सफाई करिता ७५ कोटी ४५ लाख रूपये व अतिवृष्टीमुळे बाधित होणाऱ्या जागेवर उपाय योजना करण्यासाठी ५० कोटी रूपये तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्य विभाग :

कोरोना आपत्तीनंतर महापालिकेची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासक काळात प्राधान्य देण्यात आले आहे. यावर्षीसाठी आरोग्य विभागाला ५०५ कोटी ८ लाख रुपये निधी देण्यात आला आहे. वारजे येथे ३५० बेडचे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. वानवडी येथील केपीसीटी मॉल हॉस्पिटलमध्ये बाह्यरूग्ण विभाग, आंतररूग्ण विभाग या सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहे. येरवडा येथे अर्बन ९५ प्रकल्पांतर्गत बालस्नेही रूग्णालय यावर्षी प्रस्तावित करण्यात आले आहे. महापालिकेच्या भारतरत्न अटबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपकरणे, यंत्रणा, स्टेशनरी व इतर प्रशासकीय नियुक्त्यांसाठी सन २०२३-२४ मध्ये ६२ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

घनकचरा व्यवस्थापन :

शहर सुशोभिकरणासाठी एक रूपयांचीही तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली नसली तरी, शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे व तो उचलणे आदी कामांसाठी ८४६ कोटी १७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात भांडवली तरतूद ५८ कोटी ८२ लाख रूपये व महसुली तरतूद ७८७ कोटी ३५ लाख इतकी आहे.

अत्याधुनिक हस्तांतकरण केंद्र विकसित करून कचऱ्याची विल्हेवाटची यंत्रणा स्वयंचलितरित्या कार्यान्वित करण्यात येणार आहे. याचबरोबर कन्स्ट्रक्शन ॲण्ड डिमॉलिशन वेस्ट प्रक्रिया प्रकल्प उभारणे, कचऱ्यापासून प्रक्रियेद्वारे पर्यावरणपूरक व कमी किंमतीमध्ये हॉयड्रोजन निर्माण करण्याचा वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्पाची रामटेकडी येथे उभारणी करणे आदी प्रकल्प यावर्षी नियोजित आहेत.

घनकचरा व्यवस्थापन कामांसाठी ८४६ कोटी १७ लाख रुपयांची तरतूद

यात भांडवली तरतूद ५८ कोटी ८२ लाख रूपये

महसुली तरतूद ७८७ कोटी ३५ लाख

मलनि:सारण देखभाल दुरूस्ती विभागासाठी ८१२ कोटी ७१ लाख रुपयांची तरतूद

भांडवली तरतूद ४७९ कोटी ९५ लाख रुपये

महसुली तरतूद ३३२ कोटी ७६ लाख रुपय

पाणीपुरवठा विभागासाठी १ हजार ३२१ कोटी ६७ लाख रुपयांची तरतूद

भांडवली तरतूद ५३५ कोटी ३० लाख रुपये

महसुली तरतूद ७८६ कोटी ३७ लाख रुपये

शिक्षणासाठी ३४ गावांना प्राधान्य
महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्राथमिक शिक्षण विभागासाठी ५६९ कोटी ७० लाख रूपये तर, माध्यमिक शिक्षणासाठी ९९ कोटी ७४ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. या तरतूदी करतानाच महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमधील ३४ शाळा इमारती व ६६ प्राथमिक शाळा येथील भौतिक सुविधा सक्षम करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये यांत्रिकीकरणाने सफाई करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी शैक्षणिक सहल, सर्व शाळांवर सोलर पॅनल बसविणे, ई-लर्निंग प्रकल्प राबविणे यावर्षी संदर्भीत करण्यात आले आहे.

पथ विभाग
या विभागासाठी ९९२ कोटी ७१ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात भांडवली तरतूद ७९६ कोटी ३५ लाख रूपये व महसुली तरतूद १९६ कोटी ३६ लाख रूपये इतकी आहे. या आर्थिक महापालिकेच्या समान पाणी पुरवठा, ड्रेनेजच्या सुविधांसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात खोदण्यात आलेले रस्ते पुर्वरत करण्यात येणार आहेत. याचबरोबर पुणे स्ट्रीट प्रोग्राम अंतर्गत जंगली महाराज व फर्ग्युसन कॉलेज रस्ता प्रमाणेच नव्याने ५ रस्ते पुर्नरचित करण्यात येणार आहेत. पीपीपी तत्त्वावर रस्ते विकसित करण्यावर अधिक भर राहणार असून यामध्ये सहा नवे उड्डाणपूलही प्रस्तावित आहेत. ९५ किमी अंतराचा सायकल ट्रॅक या आर्थिक वर्षात पूर्ण झाले असून, पुढील वर्षांत आणखी १० कि.मी.चा सायकल ट्रॅक विकसित करण्यात येणार आहे.

लॉ कॉलेज रस्त्याला समांतर असा बालभारती ते पौड रस्ता दरम्यानच्या २.१० कि.मी.च्या लांबीचा लिंक रस्ता करण्याचे नियोजित असून, या कामासाठी २३६ कोटी रूपये खर्चांची तरतूद करण्यात आली आहे.

पीएमपीएमएल
पुणे महानगर परिवहन महामंडळाकरिता सन २०२३-२४ करिता ४५९ कोटी ४६ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. चालू वर्षाच्या तुलनेत यात २६ कोटी २७ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या वर्षात दिघी ते आळंदी, मुकाई चौक ते भक्ती शक्ती व बोपोडी ते बाकडेवारी असे ३ बीआरटी कॉरिडॉर्स प्रस्तावित असून, या तीनही कॉरिडॉर्सची एकूण लांबी १७.५ कि.मी.इतकी आहे.

उद्यान विभाग :-

शहरातील उद्यानासाठी भांडवली तरतूद ५७ कोटी ८५ लाख व महसुली तरतूद ७१ कोटी ४ लाख रूपये अशी १२८ कोटी ८९लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चालू वर्षाच्या तुलनेत यामध्ये १९ कोटी ६४ लाख रूपये वाढ करण्यात आली आहे. पु़ ल़ देशपांडे उद्यान येथे कलाग्राम विकसित करणे, स्व़ राजीव गांधी प्राणिसंग्रहालय येथे मास्टर प्लॅननुसार अपूर्ण काम पूर्ण करणे आदी कामे केली जाणार आहेत. पुणे शहरातील उद्यानात केंद्र सरकारच्या स्वच्छ पार्क अभियानांतर्गत उपायोजना करण्यात येणार आहे. तसेच खराडी येथील स.नं.६० येथील मनपाच्या ताब्यातील जागेवर उद्यान साकारण्यात येणार आहे.

विद्युत विभाग -

या विभागासाठी भांडवली तरतूद ३० कोटी ६० ला ख रूप्ये व महसुली तरतूद ३६० कोटी ८६ लाख रूपये अशी ३९१ कोटी ४६ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. चालू वर्षाच्या तुलनेत यामध्ये १०८ कोटी २९ लाख रूपयांची अधिकची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील पथदिवे सक्षम व अद्ययावत करण्यासाठी अडीच कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. समाविष्ट गावातील प्रकाश व्यवस्था सुधारण्यासाठी ९ गावांमध्ये प्रारंभी पोल उभारणे, एल.ई.डी. दिवे बसविण्यात येणार असून त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. याचबरोबर महापालिकेच्या विविध वास्तूंमध्ये विद्युतविषयक कामे पूर्ण करण्यासाठीही आर्थिक तरतुदी करण्यात आली आहे. बंडगार्डन येथील बंधाऱ्यावर मिनी हायड्रो इलेक्ट्रीसिटी जनरेशन प्लांट उभारण्यासाठी ७ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

वाहतूक नियोजन व प्रकल्प -
या विभागाकरिता अर्थसंकल्पात ५९० कोटी ४८ लाख रूपयांची भांडवली तरतूद करण्यात आली आहे. आगामी वर्षात विश्रांतवाडी येथे पुणे मनपा व राष्ट्रीय महामार्ग योजनेंतर्गत संयुक्तपणे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. पुणे मेट्रो प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिस्स्याचे २० कोटी रूपयांच्या तरतूदीसह सांगवी बोपोडी मुळा नदीवर पूल बांधण्यात येणार आहे. पुणे शहरातील विविध स्ट्रक्चरल ऑडिट केलेल्या पुलांची दुरूस्ती करणे, सनसिटी सिंहगड रोड ते कर्वेनगर नदीवर पूल बाधणे आदी कामे पुढील वर्षात नियोजित करण्यात आली आहे.

भवन रचना -

भवन रचना विभागासाठी भांडवली तरतूद ४०९ कोटी ८५ लाख व महसूली तरतूद ५५ कोटी ७८ लाख रूपये अशी मिळून ४६५ कोटी ६३ लाख रूपये तरतूद करण्यात आली आहे. चालू वर्षाच्या तुलनेत ही तरतूद १६४ कोटींनी अधिक आहे. वाढीव तरतूदीत नायडू हॉस्पिटलच्या आवारात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह व कर्मचारी निवास उभारण्यात येणार आहे. याचबरोबर नाना पेठेतील पुणे मनपा कॉलनी वसाहतीचे पुर्ननिर्माण करणे, सेंट्रल फायर स्टेशन लोहियानगर येथील जुनी इमारत पाडून नवीन अद्ययावत फायर स्टेशन उभारण्यात येणार आहे. पु.ल.देशपांडे उद्यान येथे ६०० आसन व्यवस्थेचे ॲम्पीथिएटर व ६० गाड्यांचे ड्राईव्ह इन थिएटर बांधण्यात येणार आहे.

माहिती तंत्रज्ञान -

माहिती तंत्रज्ञान विभागासाठी पुढील वर्षासाठी ८० कोटी ६६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेतील सेवक वेतन व सेवानिवृत्त वेतन प्रणाली अद्यावतीकरण करणे, नवीन ३४ गावांमध्ये नेटवर्क व्यस्था उभारणे, ई-ऑफीसची अंमलबजावणी करणे आदी कामे प्रस्तावित करण्यात आली आहे.

हेरिटेज सेल-
या विभागासाठी महसुली ६ कोटी ६० लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये नानावाडा येथे सशस्त्र क्रांतिकारकांच्या जीवनचरित्रावर आधारित संग्रहालय फेज २ चे काम पूर्ण करण्यात येणार आहे. याचबरोबर भिडेवाडा जतन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे, मराठा शैलीमधील ऐतिहासिक लालमहालचे काम पूर्ण करणे आदी कामे केली जाणार आहेत.

Web Title: pune muncipal corporation budget PMC Budget Water supply sector is of utmost importance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.