Pune: महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ॲक्शन मोडवर; दोषींवर लवकरच कारवाई, ३ जणांची समिती नेमली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 12:36 PM2024-07-31T12:36:09+5:302024-07-31T12:37:17+5:30
पुणे महापालिकेेने तीन जणांची समिती नेमली असून सात दिवसांमध्ये अहवाल सादर झाल्यानंतर दाेषींवर कारवाई केली जाणार
पुणे: खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी साेडल्याने सिंहगड रस्तावरील एकतानगर यासह पुलाची वाडी भागात पाणी शिरले, तसेच नदीकाठी राडारोडा टाकून भराव केल्याने आणि नदी सुधार प्रकल्पामुळे पुराचे पाणी घरात शिरून नागरिकांचे माेठे नुकसान झाले. याची दखल घेत पुराची कारणमीमांसा करण्यासाठी पुणे महापालिकेेने तीन जणांची समिती नेमली आहे. यात पालिकेच्या बांधकाम, ड्रेनेज व पथ विभागाचे अधिकारी आणि पाटबंधारे खात्याच्या एका अधिकारी निमंत्रित सदस्य असणार आहे. या समितीने सात दिवसांमध्ये अहवाल सादर करायचा आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर एकतानगर भागात पाण्याचा फुगवटा निर्माण झाला. सिंहगड रस्त्यावरून येणाऱ्या नाल्याचे पाणीही वस्तीमध्ये घुसले. त्यामुळे एकतानगर व परिसरातील अन्य कॉलनीमधील पुराचा धोका कमी करण्यासाठी साेमवारपासून राडारोडा काढण्याचे काम सुरू केले आहे. राजाराम पूल ते शिवणे यादरम्यान मुठा नदीपात्रात खासगी जागा मालकांनी हजारो ट्रक राडारोडा टाकून पात्र बुजविले हाेते. त्या जागेचा व्यावसायिक वापर करण्याचा हेतू होता. यामध्ये प्रामुख्याने राजाराम पूल ते वारजे पूल यादरम्यान जास्त राडारोडा टाकण्यात आला आहे, त्यातून अनेक एकर जमीन निर्माण केली आहे. त्याकडे महापालिका प्रशासनाने सोयिस्कर डोळेझाक केल्याचा आरोप केला जात आहे.
दाेषींवर हाेणार कारवाई
या पार्श्वभूमीवर नदीकाठी राडाराेडा टाकून भराव केल्याने आणि नदी सुधार प्रकल्पामुळे पुराचे पाणी घरात शिरल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे या पुराची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुणे महापालिकेेने तीन जणांची समिती नेमली आहे. सात दिवसांमध्ये अहवाल सादर झाल्यानंतर दाेषींवर कारवाई केली जाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.