पुणे महापालिका आयुक्तांनी केला रिक्षावाल्याला दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 07:56 PM2018-12-24T19:56:54+5:302018-12-24T20:10:41+5:30
महापालिका आयुक्त सौरव राव स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय परिसरात पाहणी करत असताना त्यांच्यासमोरच एक रिक्षाचालक रस्त्यावर थुंकला.
पुणे: महापालिका आयुक्त सौरव राव स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय परिसरात पाहणी करत असताना त्यांच्यासमोरच एक रिक्षाचालक रस्त्यावर थुंकला. आयुक्तांनी त्याला जागवेरच दंड केला तसेच त्याच्याकडून रस्त्यावरील त्याजागेची स्वच्छता करून घेतली. खराडी येथे सोमवारी सकाळी हा प्रकार झाला. महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये जिन्यांवर थूंकणाऱ्या१५ जणांवर सोमवारी पथकाने कारवाई केली.
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणातंर्गत शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये पाहणी सुरू आहे. वरिष्ठ अधिकाºयांना परिसर नेमुन देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे स्वत: आयुक्त राव नगररस्ता क्षेत्रीय कार्यालय परिसरात पाहणी करत होते. त्यांच्या समवेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक तसेच उपायुक्त विजय दहिभाते, सहायक आयुक्त माधव जगताप, राजेश बनकर व अन्य अधिकारी होते. आयुक्त रस्त्यावरून फिरत असतानाच नागरिकांबरोबर संवादही साधत होते. ते असे बोलत असतानाच त्यांच्यासमोर एका रिक्षा थांब्यावर उभा असलेला रिक्षाचालक रस्त्यावरच थुंकला.
आयुक्तांनी त्वरीत त्याला समज दिली. पथकातील अधिकाºयांना बोलावले. त्याला दंड केला. तसेच पाण्याची बाटली देऊन त्याच्याकडून रस्त्यावरची ती जागा स्वच्छ करून घेतली. झोपडपट्टी, सार्वजनिक शौचालय, मंडई, रहिवासी क्षेत्र याची पाहणी केली. नागरिकांशी संवाद साधून त्यांना स्वच्छतेचे महत्व समजावून दिले. स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचकांबरोबरही आयुक्तांनी चर्चा केली व त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. आता अतिरिक्त आयुक्तांकडून अशीच वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालय परिसराची पाहणी केली जाणार असल्याचे मोळक यांनी सांगितले.
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या पथकाने आतापर्यंत रस्त्यांवर कचरा फेकणारे, थुंकणारे यांच्याकडून १२ लाख २८ हजार ८३० रूपयांचा दंड वसूल केला आहे. एकूण ५ हजार १९३ जणांवर अशी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यापासून ही कारवाई सुरू असून त्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातंर्गत स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली आहेत. सोमवारी २४ डिसेंबर रोजी सायंकाळपर्यंत १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या क्षेत्रामध्ये एकूण १४८ जणांवर कारवाई करण्यात आली व २७ हजार ७५० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यात मुख्य इमारतीमधील पथकाने इमारतींमधील जिन्यांवर थुंकणाºया १५ जणांकडून १ हजार ८५० रूपये वसूल केले आहेत अशी माहिती मोळक यांनी दिली.