पुणे महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले ५ हजार ३९७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 14:50 IST2018-01-22T14:48:42+5:302018-01-22T14:50:18+5:30
महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सन २०१८-१९ साठीचे ५ हजार ३९७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सोमवारी स्थायी समितीला सादर केले.

पुणे महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले ५ हजार ३९७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक
पुणे : नोटाबंदी, जीएसटी, आर्थिक मंदी आणि रेरा याचा मोठा फटका महापालिकेच्या अंदाजपत्रकाला बसला आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सन २०१८-१९ साठीचे ५ हजार ३९७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सोमवारी स्थायी समितीला सादर केले. यामध्ये सन २०१७-१८ च्या अंदाजपत्रकामध्ये तब्बल १७०० कोटी रुपयांची विक्रमी तूट निर्माण झाल्याने आयुक्तांनी यंदाचे अंदाजपत्रक मागील वर्षापेक्षा तब्बल २०० कोटी रुपयांनी कमी झाले आहे. हे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे जाईल. त्यानंतर स्थायी समिती त्यात सुधारणा करून अंतिम अर्थसंकल्पाला सादर करेल.
आयुक्त कुणाल कुमार यांनी सन २०१७-१८ साठी ५ हजार ६०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. यामध्ये स्थायी समितीने बदल करत ५ हजार ९९८ कोटी रुपयांचे अंतिम अर्थिक अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. परंतु यंदा नोटाबंदी, जीएसटी, आर्थिक मंदी आणि रेराचा मोठा फटका बांधकाम व्यावसायिकांना बसला असून, यामुळे उत्पन्नाचा ताळमेळच चुकला आहे. यामुळे यंदा एका बांधकाम विभागाचे उत्पन्न तब्बल ५० टक्क्यांनी घटले आहे. आयुक्तांनी अंदाजत्रपक सादर करताना डिजिटल यंत्रणा, ई-बजेट, आॅनलाईन सेवा, ई-गव्हर्नन्स, रस्ते विकास, २४ तास पाणी पुरवठा, बाआरटील अधिक प्राधान्य दिले आहे. तर अंदाजपत्रकातील पन्नास टक्के म्हणजे २ हजार ७०५ कोटी रुपये केवळ कर्मचा-यांचे पगार व संबंधित सोयी-सुविधा आणि देखभाल दुरुस्तीवर खर्च होणार आहे. दरम्यान शासनाने नव्याने लागू केलेल्या वस्तू व सेवा करातून चालू वर्षांत किमान १ हजार ८८१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे.