पुणे महापालिका आयुक्तांना मुठेतील घाण पाण्याने भरलेली बकेट देणार
By श्रीकिशन बलभीम काळे | Published: March 17, 2023 03:42 PM2023-03-17T15:42:20+5:302023-03-17T15:42:36+5:30
महापालिका नदीच्या सांडपाण्यावर काम न करता ब्युटीफिकेशनवर खर्च करण्यासाठी आग्रही
पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने मुठा नदीला स्वच्छ करण्याऐवजी तिचे ब्युटीफिकेशन केले जात आहे. नदीत जाणारे सांडपाणी बंद करणे गरजेचे आहे. जोपर्यंत सांडपाणी जात आहे, तोपर्यंत कितीही नदीचे ब्युटीफिकेशन केले तरी त्याचा उपयोग होणार नाही. ‘आरएफडी’ (रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट) च्या विरोधात नागरिक एकत्र आले असून, स्वाक्षरी मोहिम सुरू केली आहे. तसेच १९ मार्च रोजी महापालिका आयुक्तांना नदीतील घाण पाणी बादलीत सप्रेम भेट देण्यात येणार आहे.
नदीप्रेमी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मुठेच्या स्वच्छतेबाबत मागणी करत आहेत. परंतु, सांडपाण्यावर काम न करता ब्युटीफिकेशनवर महापालिका खर्च करण्यासाठी आग्रही आहे. सुमारे पाच हजार कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून, त्यासाठी प्राथमिक टप्पा बंडगार्डन पुलाजवळील नदीचा पट्टा घेण्यात आला आहे. तिथे सध्या काम सुरू आहे. त्यामुळे नदीची जैवविविधता नष्ट होणार असून, सहा हजार वृक्ष देखील तोडावे लागणार आहेत. त्यामुळे या विरोधात पुणेकरांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. नदीकाठी हा प्रकल्प राबविताना सहा हजार वृक्षही तोडणार आहेत. तिथे पक्ष्यांचा अधिवास आहे. तो नष्ट होणार आहे.
नदीप्रेमींनी आता रस्त्यावर येऊन नदी सुशोभीकरणाला विरोध करण्यासाठी ‘पुणे बकेट विश’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये नदीतील घाण पाणी बादलीमध्ये घेऊन ते महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना सप्रेम भेट देण्यात येणार आहे. जेणेकरून महापालिका आयुक्तांनी अगोदर मुठा नदीतील पाणी स्वच्छ करावे आणि नंतरच सुशोभीकरणाचा विचार करावा, अशी मागणी नदीप्रेमींची आहे.
बंडगार्डनला उद्या सायंकाळी उपक्रम
नवीन बंडगार्डन पुलाशेजारी १९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता नदीप्रेमी एकत्र येणार आहेत. त्या ठिकाणी सर्वजण स्वाक्षरी करून ते महापालिका आयुक्तांना देणार आहेत. तसेच फ्लॅश मॉबचेही आयोजन केले आहे. ‘नदी जेव्हा संपावर जाते’ ही नाटिका देखील या ठिकाणी सादर होणार आहे.
इथे व्हा सहभागी
नागरिकांनी या अभियानामध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी https://puneriverrevival.com/events या संकेतस्थळावर जाऊन माहिती घ्यावी. तिथे अभियानाची सर्व माहिती दिली आहे. नदी सुशोभीकरणासाठी ५ हजार कोटींचा खर्च पुणेकरांच्या खिशातून जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन नदीप्रेमींनी केले आहे.