पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी पृथ्वीराज बी. पी.; डॉ. कुणाल खेमनार यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती
By राजू हिंगे | Published: March 20, 2024 09:51 AM2024-03-20T09:51:12+5:302024-03-20T09:52:09+5:30
डॉ. कुणाल खेमनार यांनी पुणे महापालिकेचे विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोलाचे योगदान दिले होते
पुणे: पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी नागपूर स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. डॉ.कुणाल खेमनार यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.नागपूर स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. पृथ्वीराज बी. पी हे २०१४च्या बँचचे अधिकारी आहेत.
डॉ. कुणाल खेमनार यांची २१ ऑगस्ट 2020 रोजी पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. तीन वर्ष पाच महिने ते पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त होते. या कालावधीत त्यांनी पुणे महापालिकेचे विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
पृथ्वीराज बी.पी. हे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील ते मूळ रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गुजरातमध्ये झाले. २००४ मध्ये त्यांनी मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (आयआयटी) अभियांत्रिकीची पदवी (बीटेक) तर २००६ मध्ये त्यांनी अहमदाबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून (एमआयएम) एमबीए पदवी मिळवली. २०१४ मध्ये आयएएसमध्ये निवड झाली. सोलापूर येथे परिविक्षाधीन कालावधी तर भंडारा येथे आदिवासी विकास प्रकल्प, २०१८ मध्ये परभणी येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, लातूर जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.