पुणे महापालिकेच्या लाचखोर उपायुक्तासह पत्नीला ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 11:44 AM2022-07-07T11:44:54+5:302022-07-07T11:45:03+5:30
नातेवाईकांच्या नावावर संपत्ती लपविली आहे का? त्यांचे लॉकर आहेत का, याच्या शोधासाठी दोघांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश
पुणे : उत्पन्नापेक्षा ३१.५९ टक्के म्हणजे तब्बल एक कोटी रुपयांची अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागातील उपायुक्तासह पत्नीला अटक करण्यात आली. त्यांनी नातेवाईकांच्या नावावर संपत्ती लपविली आहे का? त्यांचे लॉकर आहेत का, याच्या शोधासाठी दोघांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी दिला.
विजय भास्कर लांडगे (वय ४९) असे उपायुक्ताचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने अटक करून दोघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी केली. त्यांच्या घरझडतीमध्ये कागदपत्रे मिळाली आहे. त्या अनुषंगाने तपास करायचा असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शितल घोगरे तपास करत आहेत.
पुणे महापालिकेचे उपायुक्त विजय लांडगे यांच्याकडे उत्पन्नापेक्षा १ कोटी रुपयांची अधिक मालमत्ता आढळून आली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. महापालिका उपायुक्त विजय भास्कर लांडगे (वय ४९, रा. ठाणगाव ता. सिन्नर, जि. नाशिक) आणि त्यांची पत्नी शुभेच्छा विजय लांडगे (वय ४३) यांना अटक करण्यात आली होती. विजय लांडगे याच्याविषयी गोपनीय चौकशी झाल्यानंतर १८ फेब्रुवारी २०२१ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालकांनी उघड चौकशीची परवानगी देण्यात आली होती. विजय लांडगे हे २४ फेब्रुवारी २००० रोजी पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदावर रुजू झाले होते. तेव्हापासून १९ फेब्रुवारी २०२१ या कालावधीतील त्यांच्या एकूण उत्पन्नाची मोजदाद करण्यात आली. त्यात त्यांचे एकूण उत्पन्न ३ कोटी २४ लाख ७९ हजार ४१२ रुपये इतके होते. त्या कालावधीत त्यांची एकूण मालमत्ता ४ कोटी २७ लाख ४० हजार ४०५ रुपये इतकी आढळून आली. हे पहाता १ कोटी २ लाख ६० हजार ९९३ रुपये (एकूण मालमत्तेच्या ३१.५९ टक्के) अधिक मालमत्ता आढळून आली आहे.