तब्बल पाच हजार कोटींची थकबाकी पुणे महापालिका वसूल करणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 12:08 PM2020-07-23T12:08:35+5:302020-07-23T12:13:30+5:30

उत्पन्नाला थकबाकी वसुलीचा लागणार का टेकू?

Pune municipal corporation doing recovery of Five thousands ammount ? | तब्बल पाच हजार कोटींची थकबाकी पुणे महापालिका वसूल करणार का?

तब्बल पाच हजार कोटींची थकबाकी पुणे महापालिका वसूल करणार का?

Next
ठळक मुद्देखर्च आणि उत्पन्नाची सांगड घालण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता

लक्ष्मण मोरे 
पुणे : महापालिकेचे मुळातच घटलेले उत्पन्न आणि कोरोनावरील वाढता खर्च पाहता पालिकेला कसरत करावी लागत आहे. राज्य शासनाकडे सातत्याने १५० कोटींची मागणी केली जात आहे. यासोबतच पदाधिकाऱ्यांकडून नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, पालिकेची तब्बल पाच हजार कोटींपेक्षा अधिक थकबाकी वसूल होणे बाकी आहे. वर्षानुवर्षे रखडलेली ही थकबाकी वसूल करण्यात प्रशासन कमी पडत आहे. 

महापालिकेच्या मिळकत कर विभागावरच सर्व डोलारा उभा आहे. यावर्षी जवळपास साडेसहाशे कोटी रुपये मिळकत कारमधून मिळालेले आहेत. परंतु, या विभागाची साडेचार हजार कोटींची थकबाकी आहे. यामध्ये मोबाईल टॉवर्स, बडे थकबाकीदार, अनधिकृत अथवा दुबार बांधकामे आदींचा समावेश आहे. मिळकत करा खालोखाल सर्वाधिक उत्पन्न बांधकाम विभागाचे मिळते. परंतु, गेल्या दोन तीन वर्षांपासून आर्थिक मंदीमुळे या विभागाचे उत्पन्न घटले आहे. यंदा कोरोनाचा फटका बसल्याने या विभागाचे उत्पन्न अगदीच तुटपुंजे आहे. यासोबतच पाणी पुरवठा विभागाची जवळपास ५०० कोटींच्या घरातील थकबाकी आहे.
 मालमत्ता व्यवस्थापन विभाग, चाळ विभाग आकाशचिन्ह विभागाची कोट्यवधींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पालिकेची विविध विभागांची पाच हजार कोटींपेक्षा अधिक असलेली थकबाकी वसूल करण्यात दहा टक्के जरी यश आले तरी पालिकेला ५०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. पालिकेचा कोरोनावर २०० कोटींपेक्षा अधिक खर्च आतापर्यंत झाला आहे. आगामी काळात उपचार आणि अन्य सुविधांवरील खर्च पाहता पालिकेला उत्पन्नात वाढ केल्याशिवाय गत्यंतर नाही. स्थायी समितीकडून सातत्याने पशासनाकडे खर्चाचा तपशील मागितला जात आहे. 
प्रशासनाला मिळालेल्या विशेषाधिकारात होत असलेल्या खरेदीकडेही लक्ष देण्याची आवश्यकता नगरसेवक व्यक्त करीत आहेत. त्यातच राज्य शासनाकडूनही अपेक्षित मिळत नसल्याची ओरड पालिकेतील पदाधिका-यांनी सुरु केली आहे. तुर्तास पालिकेलाच सर्व खर्च उचलावा लागत आहे.
 =====
 मिळकत कर आणि थकबाकी वसुलीसाठी दरवर्षी सवलत देण्याची योजना आणली जाते. ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत कर न भरल्यास थकबाकीदारांच्या दारात बँड वाजविणे, नोटिसा देणे, बोजा चढविणे अशी कारवाई केली जाते. थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
 - विलास कानडे, प्रमुख कर आकारणी व कर संकलन विभाग 
===== 
पालिकेची विविध विभागांची थकबाकी वसूल करण्यासा,ठी स्थायी समितीकडून विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. आम्ही लवकरच २७ कलमी कार्यक्रम हाती घेणार असून यासंदर्भात अधिकाऱ्यांच्या बैठका लावण्यात आल्या आहेत. पालिकेला निश्चितच चांगले उत्पन्न मिळेल. 
- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती 
======= 
थकबाकीचा तपशील

मिळकत कर विभाग ४,५०० कोटी

पाणी पुरवठा विभाग -५०० कोटी 
मालमत्ता व्यवस्थापन चाळ विभाग
आकाशचिन्ह विभाग-५० कोटी

Web Title: Pune municipal corporation doing recovery of Five thousands ammount ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.