इच्छुकांचा हिरमोड, महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:50 IST2025-03-05T13:48:14+5:302025-03-05T13:50:05+5:30
सर्वाेच्च न्यायालयात ६ मे रोजी सुनावणी

इच्छुकांचा हिरमोड, महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर
पुणे : महापालिका निवडणुकीच्या संदर्भात सर्वाेच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आता ६ मे रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
महापालिका निवडणुका रखडल्याने राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह तब्बल २३ महापालिकांवर प्रशासकीय राजवट आहे. प्रभाग रचना, लोकसंख्येत १० टक्के वाढ धरून निश्चित केलेली सदस्य संख्या आणि ओबीसी आरक्षण यावरून तब्बल ५७ वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. त्यावर एकत्रित सुनावणी २२ जानेवारी रोजी होणार होती. मात्र, बुधवारी होणाऱ्या सुनावण्यांच्या यादीत या याचिकांचा समावेश नव्हता. त्यानंतर २८ जानेवारी रोजी सुनावणी नाही. पुढील सुनावणी २५ फेब्रुवारी म्हणजे आज होती. पण आजही सुनावणी झाली नाही. या याचिकेवर आता ४ मार्च रोजी सुनावणी झाली.
या सुनावणीत निवडणुका तर दोन्ही बाजूंना हव्या आहेत, पण ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाचा प्रश्न संपला आहे की नाही? निवडणुका जुन्या प्रभाग पद्धतीने की नव्या यावर सरकारी पक्ष आणि २३ याचिकाकर्ते यांच्यात मतभेद झाले. त्यामुळे न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली. ९ ते १६ मार्च सुप्रीम कोर्टाला होळीची सुटी आहे. ६ मे रोजी पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या राजवटीत मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी ३ सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली व त्यानुसार आरक्षण सोडत काढण्यात आली होती. मात्र, महायुतीचे सरकार आल्यानंतर पुन्हा ४ सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली. ही प्रभाग रचना आता नव्याने करावी लागेल. २०१७ च्या रचनेनुसार प्रभाग रचना कायम राहिली तरी पुणे महापालिकेत २०१७ नंतर उरुळी देवाची व फुरसुंगी वगळून ३२ गावांचा समावेश झाला आहे.
त्यामुळे किमान पुणे महापालिकेत तरी नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे. प्रभाग रचना करणे, त्यावर हरकती-सूचनांची प्रक्रिया आणि अंतिम प्रभाग रचना यासाठी किमान ९० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे या निवडणुका थेट सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच घ्याव्या लागतील, अशी स्थिती आहे.
इच्छुकांच्या आशेवर पुन्हा पाणी
महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या सर्वपक्षीय इच्छुकांनी कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर, बालाजी, शिर्डी, उज्जैन या ठिकाणी देवदर्शन सहली आयोजित केल्या होत्या. हळदी-कुंकूच्या निमित्ताने अनेक इच्छुकांनी कार्यक्रम आयोजित करून लाखो रुपयांचे वाण वाटले. आता महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या खर्चावर आणि निवडणुकीच्या आशेवर पुन्हा पाणी पडले आहे.