जलतरण तलावातील निष्काळजीपणाचा पुणे महापालिकेला दणका; न्यायालयाने ५ लाखांचा दंड ठोठावला
By नम्रता फडणीस | Updated: March 29, 2025 17:44 IST2025-03-29T17:43:37+5:302025-03-29T17:44:29+5:30
जलतरण तलावातील निष्काळजीपणामुळे एका मुलाला आपला जीव गमवावा लागला होता

जलतरण तलावातील निष्काळजीपणाचा पुणे महापालिकेला दणका; न्यायालयाने ५ लाखांचा दंड ठोठावला
पुणे: महानगरपालिकेला जलतरण तलावातील निष्काळजीपणाबद्दल स्थायी लोकअदालतीने दणका दिला आहे. सहा वर्षांच्या मुलाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याने महानगरपालिकेसह ठेकेदार, सुरक्षारक्षक यांना स्थायी लोकअदालतीने तक्रारदार यांना ५ लाख २५ हजार रुपये ६ टक्के व्याजदरासह तक्रार दाखल झाल्यापासून देण्याचे, तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक, शारीरिक त्रासापोटी १ लाख रुपये अतिरिक्त देण्याचे आदेश दिले आहेत.
स्थायी लोक अदालतीचे अध्यक्ष प्रशांत कुलकर्णी व सदस्य शुभम फंड यांनी हे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या मालकीचा असलेला जलतरण तलाव एप्रिल २०१२ पासून बोपोडी कल्चरल अँड रिसर्च अकॅडमी ही खासगी संस्था चालवीत होती. अल्पवयीन मुलांना त्यांच्या सोबत पालक असल्याशिवाय जलतरण तलावात सोडू नये, तसेच तेथील सुरक्षारक्षकांनी अशा अल्पवयीन मुलांवर विशेष लक्ष ठेवावे असा नियम असतानादेखील ६ वर्षाच्या मुलाला तिकीट देऊन आत प्रवेश देण्यात आला. तसेच त्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे दि. २ जून २०१८ रोजी सकाळी पावणेबारा वाजता अरहान नावाच्या ६ वर्षांच्या मुलाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल झाला होता. जलतरण तलावातील निष्काळजीपणामुळे एका मुलाला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे महापालिकेसह ठेकेदार, सुरक्षारक्षक यांच्या विरोधात मुलाच्या आई-वडिलांनी स्थायी लोकअदालत येथे जून २०१८ मध्ये ॲड महेंद्र रामकृष्ण दलालकर यांच्या मार्फत तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी झाल्यांनतर स्थायी लोकअदालतीने तक्रारदार यांच्या बाजूने निकाल दिला.
उन्हाचे चटके जाणवू लागताच उन्हाळी सुटीत जलतरण तलावातील गर्दी वाढू लागते. चिमुकल्यासह मोठ्यांनाही थंड पाण्याचा मोह आवारत नाही. या आदेशामुळे शहरातील जलतरण तलावाच्या ठेकेदारांच्या मनमानी काराभारास आळा बसेल.- ॲड. महेंद्र दलालकर, तक्रारदारांचे वकील