पुणे महापालिकेने २६ लाख चौरस फूट बांधकामावर चालविला हातोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 09:42 AM2022-09-14T09:42:21+5:302022-09-14T09:44:06+5:30
नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये हजारो बांधकामे ही अनधिकृत आहेत..
पुणे : महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून, १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट २०२२ अखेर तब्बल २६ लाख ८९ हजार ६८४ चौरस फूट अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविण्यात आला आहे.
महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यात येत असली तरी, नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये हजारो बांधकामे ही अनधिकृत आहेत. महापालिकेने गुंठेवारीतील बांधकामे नियमित करून घेण्यासाठी अर्ज मागविले असले तरी त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे ही गुंठेवारीतील बांधकामे किती प्रमाणात नियमित होणार व भविष्यात किती अनधिकृत ठरणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
शहरात ३ हजार ९८५ अनधिकृत इमारती असून, या सर्वांना महापालिकेने नोटीस बजावली. अनधिकृत कारवाईसाठी महापालिकेच्या बांधकाम विभागातील स्वतंत्र विभाग कार्यरत आहे.
महापालिकेने शहराच्या मध्यवर्ती भागापेक्षा नव्याने समाविष्ट झालेल्या व वेगाने विस्तारणाऱ्या भागाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यानुसार उपनगरांमधील अनधिकृत बांधकामे महापालिकेच्या रडारवर आली असून, त्यांच्यावर सर्वाधिक कारवाई होत आहे.
शहरासह विशेषत: उपनगरांमधील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सदनिका घेताना ते बांधकाम हे अधिकृत आहे की नाही याची खातरजमा करून घेणे जरुरी आहे.
- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका