पुणे महापालिकेला सर्वात जास्त कर आमच्या भागाचा, तरी जलपर्णीचा त्रास आमच्याच वाट्याला का.?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 07:11 PM2021-04-12T19:11:32+5:302021-04-12T19:40:00+5:30
महापालिकेला सर्वात जास्त 'कर' जर आमच्या परिसरातून जात असेल तर आमच्या आरोग्याशी खेळ का..?
पुणे: पुणे शहरात दरवर्षी जलपर्णीचा मुद्दा ऐरणीवर येतो. नदीतील जलपर्णीमुळे नागरिकांच्या आरोग्यासह नदीतील जलचर प्राण्यांच्या जीविताला देखील धोका निर्माण होतो. मात्र, महापालिकेच्या प्रशासन यंत्रणा जोवर नागरिकांकडून जलपर्णीबाबत तक्रारींचा भडीमार होत नाही तोपर्यंत या मुद्द्याला गांभीर्याने घेत नाही हेच चित्र पाहायला मिळते. कोरेगाव पार्क,बोट क्लब रोड, बंड गार्डन परिसरातील राहिवाशांनी आता जलपर्णीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत प्रशासन यंत्रणेवर आगपाखड केली आहे.
कोरेगाव पार्क, बंड गार्डन, बोट क्लब रोड या परिसरातील नागरिकांना दरवर्षी जलपर्णीच्या त्रास होत असतो. त्रस्त नागरिक दरवर्षी संबंधित ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार करतात.त्यानंतर महापालिका यंत्रणा सुरुवातीला काही कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी औषध फवारणीसाठी पाठवते. काही दिवसांनी मग नदीपात्रातील जलपर्णी काढण्यास सुरुवात होते. मात्र, त्याआधी काही महिने तेथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. दरवर्षीच हीच समस्या उद्भवत असल्यामुळे यंदा नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे.
याबाबत रहिवाशी सती नायर म्हणाल्या, नदीपात्रात दरवर्षी, जानेवारी वा फेब्रुवारी दरम्यान जलपर्णी निर्माण होते. नंतर मार्च एप्रिल या कालावधीत तर तिचा विस्तार इतक्या मोठ्या प्रमाणात होतो की सर्वच अवघड होते. नदीत सर्वत्र जलपर्णीचेच साम्राज्य दिसू लागते.पण दरवर्षी जर ही समस्या उद्भवत असेल तर महापालिका प्रशासन यंत्रणा मार्च एप्रिल महिना उजाडण्याची वाट का पाहते. नागरिकांच्या व जलचर प्राण्यांच्या आरोग्याशी खेळवड का करते, हेच समजत नाही.
जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षीच्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेली असते. तरीदेखील या समस्येकडे तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नाही. यात अधिकारी, कंत्राटदार यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे, असेही नायर यावेळी सांगितले आहे.
या भागातील काही नागरिक म्हणाले, नदीपात्रात जलपर्णी निर्माण होण्यास सुरुवात झाली की आम्ही प्रशासनाकडे याबाबत तक्रार करत असतो.पण ते एप्रिलच्या उजाडेपर्यंत याकडे दुर्लक्ष करते.जर सर्वात जास्त कर महापालिकेला आमच्या भागातून भरला जात असेल तर अशी हेळसांड योग्य नाही.त्यामुळे प्रशासनाने आमचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही तर महापालिकेचा कर भरणार नाही. याविषयी महापालिकेची भूमिका जाणून घेण्याकरिता प्रशासनाशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.