अत्यावश्यक सेवा वगळता रस्ते खोदाई पुणे महापालिकेने थांबवली
By निलेश राऊत | Published: May 5, 2023 05:48 PM2023-05-05T17:48:18+5:302023-05-05T17:48:34+5:30
अत्यावश्यक सेवा म्हणजेच एमएनजीएल, महावितरण व समान पाणी पुरवठ्याची कामे १० मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश
पुणे : शहरातील विविध रस्त्यांवर अत्यावश्यक सेवा म्हणजेच एमएनजीएल, महावितरण व समान पाणी पुरवठ्याची कामे १० मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पावसाळी गटारे व नाले सफाईची कामे १० जूनपर्यंत पुर्ण करावेत अशा सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
पावसाळी कामांचा महापालिका आयुक्तांनी नुकताच आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. शहरात आत्तापर्यंत पावसाळी गटारे व नाले सफाईची २६ टक्के कामे पूर्ण झाली असून हे काम येत्या १० जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. गत पावसाळ्यात शहरातील रस्त्यांना आलेल्या ओढ्याचे स्वरूपामुळे महापालिका प्रशासनावर टिकेची झोड उठली होती. यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याची तयार महापालिकेने केली आहे.
आजमितीला शहरातील रस्ते दुरूस्तीची ८० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. तसेच केबल व अन्य सेवा वाहीन्यांसाठी खोदाईची परवानगी देताना ३१ मे पुर्वी खोदाई केलेल्या रस्त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने दुरूस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारे अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेशही अधिकार्यांना दिले आहेत.
ड्रेनेजलाईनसाठी विशेष अधिकार वापरून जागा घेणार
समाविष्ट गावांमध्ये ३८५ कोटी रुपयांची ड्रेनेज लाईनची कामे सुरू आहेत. मागील दीड वर्षांपासून ही कामे सुरू असून पुढील अडीच वर्षात कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. आराखड्यानुसार ड्रेनेज लाईनची कामे करताना काही ठीकाणी खाजगी जागेतून पाईपलाईन टाकाव्या लागणार आहेत. याला जागा मालकांचा विरोध होत आहे. अशा ठिकाणी कायद्याचा वापर करून ड्रेनेज लाईनची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.