पुणे महापालिका: 'खादाड' आरोग्य निरीक्षकांना कोण लावणार 'लगाम'....?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 11:02 AM2021-11-15T11:02:03+5:302021-11-15T11:05:03+5:30
महापालिका क्षेत्रीय कार्यालयात काम करणाऱ्या आरोग्य निरीक्षकांकडे सार्वजनिक स्वच्छतेसह विविध परवानग्या तसेच कचरा व्यवस्थापनाचे महत्वपूर्ण काम दिलेले आहे
येरवडा: कचरा उचलण्याच्या कामासाठी पाच हजाराची लाच घेणाऱ्या महापालिका आरोग्य निरीक्षकाला नुकतीच अटक करण्यात आली. यानिमित्ताने महापालिका आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराचा नमुना उघडकीस आला आहे. महापालिका क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आरोग्य निरीक्षकांच्या अखत्यारीत येणाऱ्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी केली जाते. किंबहुना बरीच कामे ही पैशाची देवाण-घेवाण केल्याशिवाय होतच नाहीत. नुकसान होऊ नये यासाठी बऱ्याचदा "तोंडावर बोट" ठेवले जाते. या व्यवस्थेमध्ये अनेकांचे "हात" गुंतल्यामुळे कोणीच "चकार"शब्द काढत नाही. इतर शासकीय कार्यालयांमध्ये वरिष्ठ पातळीवर अशा प्रकारांमध्ये गंभीर दखल घेतली जाते. मात्र महापालिका प्रशासनात तसे दिसून येत नाही त्यामुळे वारंवार अशा घटना घडत आहेत.
महापालिका क्षेत्रीय कार्यालयात काम करणाऱ्या आरोग्य निरीक्षकांकडे सार्वजनिक स्वच्छतेसह विविध परवानग्या तसेच कचरा व्यवस्थापनाचे महत्वपूर्ण काम दिलेले आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून ते खाजगी व्यावसायिक तसेच इतर अनेक लहान मोठे लोक आरोग्य निरीक्षकांच्या संपर्कात येत असतात. आरोग्य निरीक्षकांकडून कामे करून घेण्यासाठी त्यांनी "दिलेला दर" मोजावा लागतो. महापालिका आरोग्य विभागाकडील स्वच्छता कर्मचारी किंवा ठेकेदाराकडून कर्मचारी यांच्या हजेरी लावण्यापासून ते इतर अनेक कामांसाठी "वजन" ठेवावेच लागते. घरोघरी कचरा वेचण्यासाठी महापालिकेने स्वच्छ संस्थेची यंत्रणा मदतीसाठी घेतलेली आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी खाजगी कचरा वेचण्यासाठी आरोग्य निरीक्षकांमार्फत स्वतंत्र खाजगी यंत्रणा उभी केल्याचे देखील समजते.
एकंदरीतच या सर्व व्यवस्थेत मोठा भ्रष्टाचार सर्रास सुरू आहे. एरवी शासकीय यंत्रणेतील काही ठराविक विभागालाच भ्रष्टाचाराच्या आरोपासाठी बदनाम केले जाते. मात्र महापालिका आरोग्य विभागाच्या "खाकी" यंत्रणेकडून मोठ्या प्रमाणावर पैसे खाण्याचा उद्योग सर्रास सुरू असल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे. आगामी काळात तरी महापालिका प्रशासनाकडून "या" खादाड आरोग्य निरीक्षकांना "लगाम" लावण्यात येणार का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे.