फ्री बेडची माहिती आता आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 07:41 AM2017-07-26T07:41:38+5:302017-07-26T07:41:42+5:30
महापालिकेकडून सवलतीच्या दरात जागा घेऊन त्यावर रुग्णालय बांधणाºया मोठ्या रुग्णालयांच्या व्यवस्थापनांना त्यांच्या एकूण बेडच्या प्रमाणात दहा टक्के बेड महापालिकेला विनामूल्य द्यावे लागतात.
पुणे : महापालिकेकडून सवलतीच्या दरात जागा घेऊन त्यावर रुग्णालय बांधणाºया मोठ्या रुग्णालयांच्या व्यवस्थापनांना त्यांच्या एकूण बेडच्या प्रमाणात दहा टक्के बेड महापालिकेला विनामूल्य द्यावे लागतात. मात्र त्यांच्याकडून हे बंधन पाळले जात नसल्यामुळे आता महापालिकेच्या वतीने या फ्री बेडची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. त्या-त्या रुग्णालयांनाही त्यांच्या संकेतस्थळावर अशी माहिती टाकण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.
स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. शिवसेना नगरसेवक बाळा ओसवाल व विशाल धनवडे यांनी हा प्रस्ताव समितीला दिला होता. रुग्णालयांच्या या माहिती दडवण्यामुळे महापालिकेला शक्य होत असूनही गरीब रुग्णांना या सेवेचा लाभ देणे शक्य होत नाही. फक्त बेड फ्री मिळाला तरी रुग्णांच्या पैशांची मोठ्या प्रमाणावर बचत होऊ शकते असा ओसवाल व धनवडे यांनी प्रस्तावात म्हटले होते.
मोहोळ यांनी सांगितले, की प्रस्तावाची त्वरित अंमलबजावणी करण्यास प्रशासनाला सांगण्यात आले आहे. शहरात रुबी हॉलमध्ये १२, सह्याद्री-डेक्कनमध्ये ५, सह्याद्री-बोपोडीमध्ये ३०, बुधराणीमध्ये १० व एम्समध्ये १० असे विनामूल्य बेड उपलब्ध आहेत. ते पालिकेचे आहेत. त्यामुळे महापालिकेने शिफारस केलेल्या रुग्णांना ते विनामूल्य मिळतील. त्याचे शुल्क रुग्णालयाला घेता येणार नाही. ही सर्व माहिती यापुढे महापालिकेच्या संकेतस्थळावर मिळेल, ती अपडेट केली जाईल, असे मोहोळ म्हणाले.