सर्वपक्षीय नेते वेताळ टेकडीवर रस्ता करण्याच्या विरोधात; पालिकेने दक्ष राहून लक्ष द्यावे- डॉ. नीलम गोऱ्हे
By श्रीकिशन काळे | Published: April 24, 2023 04:16 PM2023-04-24T16:16:07+5:302023-04-24T16:27:33+5:30
पुणे महापालिका पर्यावरण टिकविण्यासाठी गंभीर नाही
पुणे : पुणे महापालिका प्रशासन पर्यावरण टिकविण्यासाठी गंभीर दिसत नाही. त्यांचे पर्यावरणाकडे लक्षच नाही. वेताळ टेकडीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्था आणि प्रशासन यांची बैठक हवी. त्यानंतर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी माहिती उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. याविषयी सरकारलाही योग्य त्या सूचना देऊ, असेही त्या म्हणाल्या.
नुकताच झालेल्या महाराष्ट्रातील विधीमंडळ सदस्यांचा 'जपान अभ्यास दौरा' झाला. या संदर्भात माहिती देण्यासाठी त्यांनी सोमवारी (दि.२४) सकाळी मॉडेल कॉलनी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या वेळी पत्रकारांशी बोलत होत्या. 'वेताळ टेकडी बचाव कृती समिती'च्या सदस्यांनी त्यांची भेट घेऊन सर्व माहिती दिली.याप्रसंगी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून वेताळ टेकडीवरील प्रस्तावित बालभारती रस्ता चर्चेत आला आहे. नागरिकांच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाल्याने राजकीय नेतेही आता जागे झाले आहेत. काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील टेकडीची पाहणी करून या विषयाची माहिती घेतली होती. त्यानंतर अनेक राजकीय पक्ष्यांच्या नेत्यांनी यावर आपले मत मांडले आहे. सर्वपक्षीय नेते वेताळ टेकडीवर रस्ता करण्याच्या विरोधात आहेत. त्यामुळे आता उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्यासमोर वेताळ टेकडीचा प्रश्न गेला आहे. त्यांनी देखील पुण्याच्या पर्यावरणाबाबत काळजी व्यक्त केली आहे. पर्यावरण जपणे आवश्यक आहे आणि त्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने दक्ष राहून लक्ष दिले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.