पुणे महापालिकेची सात लाख चौरस फूट जागा हरवली!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 09:14 AM2022-06-16T09:14:05+5:302022-06-16T09:15:01+5:30

महापालिकेच्या मालमत्ता विभागाला पत्ताच नाही

pune Municipal Corporation loses 7 lakh square feet land pmc | पुणे महापालिकेची सात लाख चौरस फूट जागा हरवली!

पुणे महापालिकेची सात लाख चौरस फूट जागा हरवली!

Next

-नीलेश राऊत

पुणे : महापालिकेची तब्बल सात लाख चौरस फुटांची जागा हरवली आहे. क्षेत्रीय कार्यालयांनी ही जागा कोणाल दिली याचा पत्ताच मालमत्ता विभागाला नाही. या जागेची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे. मात्र, मालमत्ता विभागाकडे त्याची नोंद नसल्याने या जागेचे कोणतेही उत्पन्न महापालिकेला मिळत नाही. आजी- माजी माननीयांच्या संस्थांनी ही जागा हडपल्याचा संशय आहे.

महापालिकेच्या भवन विभागाकडून तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून उभारण्यात आलेल्या अनेक मिळकतींची माहिती मालमत्ता विभागाने संकलित करण्यासाठी पावले उचलली. तब्बल ७ लाख २ हजार चौरस फुटांच्या ४६८ मिळकती कोणाला दिल्या आहेत, त्यांचा मोबदला कोण घेत आहे याचा तपशीलच महापालिकेच्या मुख्य दप्तरी नसल्याचे दिसून आले आहे.

नागरी सुविधांसाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या विविध वास्तूंचा वापर व त्यांचे वितरण हे महापालिकेच्या परवानगीशिवाय काही माननीयांनी आपल्या प्रभागात खासगी संस्थांना केले आहे. यामध्ये भवन विभागाद्वारे उभारण्यात आलेल्या मिळकतींपैकी ५७ मिळकतींचा ताबा मालमत्ता विभागाने नुकताच घेऊन त्या संबंधित विभागाकडे वर्ग केल्या आहे.

‘लोकमत’च्या वृत्तामुळे प्रकार उघडकीस

खराडी येथील अहिल्यादेवी होळकर सभागृह व राजाराम पठारे इनडोअर स्टेडियम कोण चालवीत आहे, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने नुकतेच प्रसिद्ध केले होते. तेव्हा मालमत्ता विभागाने महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयांकडे त्यांच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या १ हजार ५०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या आतील मिळकतींची माहिती मागविली. १४ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ४६८ मिळकती बांधल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

यामध्ये समाजमंदिरे, बहुउद्देशीय हॉल, आरोग्य केंद्र, अभ्यासिका, बचत गट केंद्र, विरंगुळा केंद्र, आदी इमारती बांधण्यात आल्या आहेत; परंतु या सर्व मिळकती सध्या कोणाला दिल्या आहेत, त्याच्या वापराच्या बदल्यात महापालिकेला काही मोबदला मिळतो का, याचा तपशील मात्र प्राप्त झालेला नाही.

Web Title: pune Municipal Corporation loses 7 lakh square feet land pmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.