पुणे महापालिकेने वॉटर ऑडिट करुन घेणे आवश्यक : जलसंपदा विभागात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 12:52 PM2019-03-06T12:52:47+5:302019-03-06T12:56:53+5:30
पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागामध्ये अनेक वेळा वाद निर्माण झाले आहेत.परंतु,उपलब्ध पाणीसाठी आणि पालिकेकडून होत असलेला पाण्याचा वापर यामुळे पुढील काळात मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते.
पुणे: पाण्याची होणारा गळती आणि प्रत्यक्षातील पाण्याचा वापर तसेच लोकसंख्येनुसार पालिकेला पाण्याची किती आवश्यकता आहे,याबाबतची योग्य माहिती समजावी,या उद्देशाने नागपूर महापालिकेने वॉटर ऑडिट करून घेतले आहे.त्यामुळे पुणे महापालिकेने सुध्दा लवकर पाण्याचे ऑडिट करून घेणे अपेक्षित आहे. ऑडिट झाल्यास पुणे शहराच्या पाण्याची अचूक गरज समजण्यास मदत होईल,अशी चर्चा जलसंपदा विभागात केली जात आहे.
काही वर्षांपूर्वी नागपूर महापालिकेने महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे शहरातील पाण्याची गळती आणि पालिका क्षेत्रातील नागरिकांच्या पाण्याची गरज, पालिका हद्दीतील व्यावसायिकांना आवश्यक असलेले पाणी, वाया जाणारे पाणी याची योग्य माहिती तयार केली. या माहितीच्या आधारे जलसंपदा विभागातील अधिका-यांकडून वॉटर ऑडिट करून घेतले. जलसंपदा विभागातील अधिका-यांनी प्रत्यक्षात जागेवर जावून तपासणी केली. त्यामुळे शहरातील एकूण लोकसंख्येकडून होत असलेला पाण्याचा वापर आणि गळती यांची योग्य माहिती मिळाली.परिणामी प्राधिकरणाच्या नियमावलीनुसार नागपूर पालिकेला पाणी देणे शक्य झाले. वॉटर ऑडिटमुळे नागपूर महापालिकेची पाण्याचा गरज समजणे सोपे झाले.त्यामुळे पुणे महापालिकेने सुध्दा लवकर वॉटर ऑडिट करून घेणे अपेक्षित आहे.
पुणे महापालिकेकडून गेल्या अनेक वर्षांपासून वॉटर ऑडिट करून घेतले नाही.त्यामुळे पालिकेची पाणी गळती आणि पाण्याची चोरी समोर येत नाही.त्यामुळे पालिकेने लवकर वॉटर ऑडिट करून घ्यावे,अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या होत्या. पालिकेला सध्या दररोज ११५० एमएलडी पाणी मंजूर आहे.परंतु,वाढती लोकसंख्या आणि पाण्याची चोरी यामुळे सध्या पालिकेकडून १३५० एमएलडी पाणी घेतले जात आहे. त्यामुळे पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागामध्ये अनेक वेळा वाद निर्माण झाले आहेत.परंतु,उपलब्ध पाणीसाठी आणि पालिकेकडून होत असलेला पाण्याचा वापर यामुळे पुढील काळात मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे पुणे महापालिकेने नागपूर महापालिकेने प्रमाणे वॉटर ऑडिट करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे पुण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे सोपे होणार आहे,असे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांकडून बोलले जात आहे.
.................
नागपूर महापालिकेने वॉटर ऑडिट करून घेतले.त्याच्या पालिकेला आणि जलसंपदा विभागाला उपयोग झाला.पुणे महापालिकेचे वॉटर ऑडिट अद्याप झालेले नाही.त्यामुळे पुणे महापालिकेने सुध्दा लवकर वॉटर ऑडिट करून घेणे अपेक्षित आहे. त्यामुळे पाण्याचा होणारा वापर, पाण्याची गळती याबाबतची माहिती समोर येईल.
- राजेंद्रकुमार मोहिते ,मुख्य अभियंता,जलसंपदा विभाग