पुणे महापालिकेचा अजब कारभार : मृत कर्मचाऱ्याला लावली इलेक्शन डयुटी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 07:16 PM2019-06-06T19:16:34+5:302019-06-06T19:22:04+5:30
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४२ अ व ब आणि प्रभाग क्रमांक १(अ) च्या पोटनिवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने कर्मचा-यांची नियुक्ती केली असून, यामध्ये पाच महिन्यांपूर्वी मृत्यु पावलेल्या नगर सचिव विभागातील शिपाई चंद्रकांत रामचंद्र रसाळ कर्मचा-याला देखील निवडणुकीची ड्युटी लावण्यात आली आहे.
पुणे : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४२ अ व ब आणि प्रभाग क्रमांक १(अ) च्या पोटनिवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने कर्मचा-यांची नियुक्ती केली असून, यामध्ये पाच महिन्यांपूर्वी मृत्यु पावलेल्या नगर सचिव विभागातील शिपाई चंद्रकांत रामचंद्र रसाळ कर्मचा-याला देखील निवडणुकीची ड्युटी लावण्यात आली आहे. याबाबत तातडीने निवडणुकीच्या कामावर हजर राहण्याचे आदेश देखील विभागाने दिले. परंतु नियुक्ती दिलेली व्यक्तीच हयात नसल्याचे नगर सचिव विभागाने महापालिकेच्या सामान्यप्रशासन विभागाला काळविले आहे.
महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांसाठी प्रभाग क्रमांक ४२ अ व ब आणि प्रभाग क्रमांक १(अ) च्या पोटनिवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. येत्या २३ जून रोजी या तीन जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या कामांसाठी महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात एकट्या नगरसचिव विभागातील २५ कर्मचा-यांना निवडणुकीची ड्युटी लावण्यात आली आहे. यामध्येच या मृत कर्मचा-याचा समावेश आहे.
नगरसचिव विभागातील कर्मचा-यांची नियुक्ती कुणाच्या पथ्यावर
नगरसचिव विभागातील कर्मचा-यांचा शहरातील सर्व नगरसेवकांसोबत विविध कामा निमित्त थेट संबंध येतो. परंतु याच विभागातील सर्वांधिक सुमारे २५ कर्मचा-यांना महापालिकेच्या पोटनिवडणुकीची कामे देण्यात आली आहेत. त्यामुळे नगरसचिव विभागातील कर्मचा-यांची नियुक्ती या निवडणुकीत नक्की कुणाच्या पथ्यावर पडणार हे लवकर स्पष्ट हाईल.
सामान्य प्रशासन विभागाच्या सूचीनुसार कर्मचा-यांना नियुक्ती
निवडणुकीच्या कामांसाठी कर्मचा-यांची नियुक्ती करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून यादी मागविण्यात येते. त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या यादीच्या आधारे निवडणुकीच्या कामांसाठी कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये आमच्या विभागाचा काही दोष नाही.
-विजय दहिभाते, उपआयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी