Corona Vaccination: पुणे महापालिकेला मिळाले लसीचे 'दोन लाख' डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 12:35 PM2021-12-08T12:35:51+5:302021-12-08T12:36:09+5:30
महापालिकेकडे शासनाकडून आलेल्या लसीपैकी सद्यस्थितीला ४० हजाराहून अधिक लससाठा शिल्लक आहे
पुणे : महापालिकेला एका खासगी कंपनीने (बजाज) दोन लाख कोव्हीशील्ड लसीचे डोस देऊ केले आहेत. यापैकी एक लाख डोस महापालिकेला सुयांसह प्राप्त झाले आहेत. तसेच दुसरीकडे राज्य शासनाकडूनही महापालिका मागणी करेल त्याप्रमाणात कोव्हीशील्ड व कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा करत असल्याने, महापालिकेकडे शासनाकडून आलेल्या लसीपैकी सद्यस्थितीला ४० हजाराहून अधिक लससाठा शिल्लक आहे.
कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूमुळे सध्या लसीकरणासाठी नागरिकांकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यातच १८ वर्षांवरील ज्या नागरिकांनी लसीचा पहिला डोस प्रांरभी घेतला आहे, त्यांचे ८४ दिवस पूर्ण होत असल्याने लसीकरण केंद्रांवर दररोज २० हजाराहून अधिक जणांना लसीचा दुसरा डोस दिला जात आहे.
नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात लसीचा पहिला डोस घेतलेल्या बहुतांश जणांचे ८४ दिवस पूर्ण होत असल्याने, सध्या लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे पुरवठा केलेल्या लसींपैकी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक लस आजमितीला प्रत्यक्षात टोचल्या जात आहेत. परिणामी, लसीकरण केंद्रांवर लस शिल्लक राहण्याचे प्रमाण आता नगण्य झाले आहे.
आज महापालिकेच्या १८६ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस
महापालिकेच्या १८६ केंद्रांवर आज प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर ससून रुग्णालयासह महापालिकेच्या ११ दवाखान्यांमध्ये प्रत्येकी ५०० कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना ५ टक्के लस ही ऑनलाईन बुकिंगद्वारे, तर ५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ४५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (१६ सप्टेंबरपूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाईन बुकिंगद्वारे तर ४५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. तसेच कोव्हॅक्सिन लसीचा ११ नोव्हेंबरपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस मिळणार आहे.