पुणे महापालिकेच्या ‘नदीकाठ सुधार’ मुळे पुराचा धोका आणखी वाढणार; पर्यावरण तज्ज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 12:46 PM2023-05-09T12:46:38+5:302023-05-09T12:46:48+5:30

पुण्यातील नदीमध्ये प्रचंड प्रदूषण आहे आणि पूर या दोन प्रमुख समस्या सोडून महापालिका केवळ सुशोभीकरण करत आहे

Pune Municipal Corporation riverbank improvement will further increase flood risk; Warning of environmental experts | पुणे महापालिकेच्या ‘नदीकाठ सुधार’ मुळे पुराचा धोका आणखी वाढणार; पर्यावरण तज्ज्ञांचा इशारा

पुणे महापालिकेच्या ‘नदीकाठ सुधार’ मुळे पुराचा धोका आणखी वाढणार; पर्यावरण तज्ज्ञांचा इशारा

googlenewsNext

पुणे : महापालिका नदीकाठ पुनरुज्जीवन प्रकल्प मुठा नदीला मारक आहे. नदीचे कॅनॉल करणे म्हणजे नदीकाठ पुनरुज्जीवन नव्हे. केवळ सुशोभीकरणावर भर देऊन सांडपाणी सोडत राहणे म्हणजे पुनरुज्जीवन नव्हे. नदी जशी प्रवाही आहे, तशीच ठेवून तिची जैवविविधता जपणे आवश्यक असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. हा प्रकल्प केला तर पुराचा धोका आणखी वाढेल, असा इशारा या वेळी दिला.

‘पुण्याच्या नद्यांचे भवितव्य नक्की कशात आहे?’ या विषयावर रविवारी ऑनलाइन चर्चासत्र आयोजित केले होते. त्यामध्ये ‘समुचित एनवायरोटेक’च्या संचालक डॉ. प्रियदर्शिनी कर्वे, ‘जीवित नदी’च्या संस्थापक शैलजा देशपांडे, ‘ऑयकॉस’च्या सहसंस्थापक केतकी घाटे, मानसी करंदीकर यांनी सहभाग घेतला. त्यांनी महापालिकेच्या प्रकल्पाविषयी माहिती दिली आणि त्यानंतर पर्यावरणपूरक प्रकल्प कसा राबवता येईल, त्याचे सादरीकरण करण्यात आले.

देशपांडे म्हणाल्या, “पुण्यातील नदीमध्ये प्रचंड प्रदूषण आहे आणि तिला पूर येतो. या दोन प्रमुख समस्या आहेत. त्यावर काम करायचे सोडून महापालिका केवळ सुशोभीकरण करत आहे. नदीकाठी कृत्रिम हिरवाई नको आहे. त्या ठिकाणी रायपेरियन झोन असतो, जो नैसर्गिक असतो. तोच ठेवला पाहिजे. जो आता बंडगार्डन येथे नष्ट केला जात आहे.’’

सांडपाणी शुद्धीकरणासाठी काहीही तरतूद नाही

पुण्यातील अभ्यासू नागरिक संघटनांनी एकत्र येऊन सातत्याने या प्रकल्पाला २०१७ पासून विरोध केला आहे आणि पर्यायही सुचवले आहेत. पण, याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. जायका प्रकल्पाखालील ११ सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण झाल्यावरही शहराच्या सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया होणार नाही. नदी सुधार प्रकल्पात सांडपाणी शुद्धीकरणासाठी काहीही तरतूद नाही. भिंती बांधून नदीचे कालव्यात रूपांतर केल्याने पुराचा धोका कमी होणार नसून वाढणार आहे, हे अभ्यासकांनी दाखवून दिलेले आहे. -प्रियदर्शिनी कर्वे

नद्यांची नैसर्गिक स्थिती ओळखून नियाेजन करा

प्रस्तावित प्रकल्पामुळे नदी ‘नदी’ राहणार नाही, तर तो नुसताच पाणी वाहून नेणारा चॅनेल होईल. नदीचा विकास हे पाश्चिमात्य देशांचे अंधानुकरण आहे. विषुववृत्तीय प्रदेशात असल्याने भारतीय नद्यांचे रूप दर किलोमीटरवर वेगळे आहे. त्यांच्या पात्रात, काठावर असंख्य आसरे असतात. त्यांच्याशी निगडित भरपूर जैवविविधता असते. काठांवरचे उंबर, अर्जुन, वाळुंज आदी वृक्षांनी बहरलेले हरित पट्टे तापमान नियंत्रित ठेवतात. सद्य:स्थितीतही नद्यांच्या काठी अनेक पट्ट्यांत दाट झाडी आहे. ती काढणे चुकीचे ठरेल. दर किलोमीटरला बदलणारी नद्यांची नैसर्गिक स्थिती ओळखून प्लॅनिंग करायला हवे, असे मत केतकी घाटे यांनी व्यक्त केले.

निसर्गाचा विचार करून शहरातील नदी सुधार शक्य

निसर्ग आधारित, निसर्गाचा विचार करून शहरातील नदी सुधार शक्य आहे. नदीचे पात्र-रुंदी राखणे, सांडपाणी, कचरा नदीत येऊ नये याकरिता निरनिराळ्या पातळ्यांवर काम करणे आवश्यक आहे. नदीकाठची झाडी, विशेष वृक्षसंरक्षण, नदीपात्र व काठाचे अधिवास सुधारणे, शहरातून नैसर्गिक वाहणारी, स्वच्छ नदी असू शकते याचे उत्तम उदाहरण करणे अशा प्रकारच्या आखणीतून शक्य होईल. -मानसी करंदीकर

Web Title: Pune Municipal Corporation riverbank improvement will further increase flood risk; Warning of environmental experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.