CoronaVirus: कोरोनाला रोखण्यासाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 11:53 PM2020-04-19T23:53:32+5:302020-04-19T23:54:33+5:30
आदेश येत्या 27 एप्रिलपर्यंत लागू राहणार
पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पुणे महापालिकेच्या सर्व हद्दी रविवारी मध्यरात्रीपासून सील करण्यात येत असल्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जरी केले. हे आदेश येत्या 27 एप्रिल पर्यंत लागू राहणार आहेत.
या आदेशाप्रमाणे केवळ जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्ती, त्यांची कार्यालये व वाहने यांना वगळण्यात आले आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणालाही पुणे महापालिका हद्दीत प्रवेश दिला जाणार नाही तसेच बाहेरही जाऊ दिले जाणार नाही.
महापालिका तसेच अन्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या वतीने 10 टक्के उपस्थितीनुसार आवश्यक पास दिले जाणार आहेत.पोलिस यंत्रणेकडून देण्यात आलेल्या कालावधीतच जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने खुली राहणार आहेत. दरम्यान विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाईचे अधिकारही क्षेत्रीय कार्यालय सहआयुक्त यांना देण्यात आले आहेत.
पुणे महापालिका हद्दीतील 15 क्षेत्रीय कार्यालयापैकी 13 क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील कोरोना संसर्ग प्रमाण वाढलेले असल्याने या भागात विशेष बाब म्हणून मोठी खबरदारी घेतली जाणार आहे.
पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने, पुणेकरांच्या सार्वजनिक आरोग्यच्या दृष्टीने नागरिकांच्या हालचाली व बाहेर फिरण्यावर मर्यादा आणणे आवश्यक बनल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. याची मुख्य अंमलबजावणी करण्याचे काम आता पोलीस यंत्रणेबरोबरच पालिका सह आयुक्तांनाही देण्यात आल्याने कर्फ्यु ची काटेकोर अंमलबजावणी होणार हे निश्चित झाले आहे. परिणामी नागरिकांनी घराबाहेर न पडणे हे क्रमप्राप्तच झाले आहे.