"पुणे महापालिकेने 'क्वारंटाईन'घरातील कचरा वेगळा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी.."
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 03:12 PM2021-03-04T15:12:10+5:302021-03-04T15:15:26+5:30
गेल्यावर्षी पुण्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला असताना पुणे महानगरपालिकेने गृह विलगीकरण बाधितांचा कचरा उचलण्याची स्वतंत्र यंत्रणा केली होती.
पुणे : पुणे शहरात मागील काही महिन्यात आटोक्यात आलेली कोरोनाग्रस्तांची संख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. पुन्हा एकदा शहरात कोरोनाचा विस्फोट होऊ नये या पार्श्वभूमीवर पुणेकरांवर महापालिकेने काही निर्बंध देखील लादण्यात आले आहे. याचवेळी बहुसंख्य कोरोनाबाधित रुग्ण 'होम क्वारंटाइन'चा पर्याय स्वीकारत आहे. अशावेळी पुणे महानगरपालिकेने 'गृहविलगीकरण'घरांतील कचरा वेगळा गोळा करून तो जाळून टाकत त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याची व्यवस्था तातडीने करण्याची गरज आहे, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली आहे.
वेलणकर म्हणाले, गेल्यावर्षी पुण्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला असताना पुणे महानगरपालिकेने गृह विलगीकरण बाधितांचा कचरा उचलण्याची स्वतंत्र यंत्रणा केली होती. यात पुण्याच्या प्रत्येक प्रभागात एक स्वतंत्र गाडी व त्यावर स्वच्छता सेवकांचा एक संघ कार्यरत होता. गृह विलगीकरण घरामधील लोकांकडून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे ठेवला जात होता. योजनेतील कचरा सेवक दोन दिवसांतून एकदा येऊन दाराबाहेरील कचरा घेऊन जात होते. कचरा पिशव्यांमध्ये पॅक करून त्यावर सॅनिटायझर मारून दाराबाहेर ठेवावा हे नागरिकांचे काम होते. ही सेवा पूर्णपणे मोफत होती.
महापालिकेची ही योजना सध्या बंद असल्याने अनेक ठिकाणी विलगीकरण केलेल्या घरांमधील कचराही सोसायटीच्या इतर कचऱ्यात एकत्रितपणे टाकला जात आहे. ही बाब अत्यंत धोकादायक आणि चिंताजनक आहे.यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
....
पुणे शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तातडीने पुण्यातील क्वारंटाईन घरांमधील कचरा स्वतंत्रपणे उचलण्याची सोय महापालिकेने परत सुरू करणे अतिशय गरजेचे आहे.
- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच.