पुणे महापालिकेने ४७४ बड्या मालमत्तांची १२१८ कोटींची थकबाकी वसूल करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 11:16 AM2020-09-02T11:16:47+5:302020-09-02T11:17:06+5:30
पुणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे १ कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त कराची थकबाकी असलेल्या मालमत्तांची माहिती समोर
पुणे : महापालिकेच्या विधी आणि मालमत्ता कर विभागाने विशेष कक्ष स्थापन करून, १ कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कराची थकबाकी असणाऱ्या ४७४ थकबाकीदारांकडून १ हजार २१८ कोटी रुपयांची थकबाकी तात्काळ वसूल करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी सजग नागरिक मंचने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारात पुणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे १ कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मालमत्तांची माहिती मागितली असता ही बाब समोर आली आहे. ज्या ४७४ थकबाकीदारांकडे १२१८ कोटी रुपयांची थकबाकी आहे, त्यापैकी ५० दावे विविध न्यायालयात प्रलंबित असून, यात अडकलेली मिळकत कराची रक्कम ३७५ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे दोन दाव्यामध्ये अडकलेली रक्कम तब्बल २२१ कोटी रुपयांची आहे.
मोबाईल टॉवरच्या २७३ दावे न्यायालयात असून, यात अडकलेली मिळकत कराची रक्कम ३९० कोटी रुपये आहे. त्यामुळे महापालिकेच्या विधी आणि मालमत्ता कर विभागाने विशेष कक्ष स्थापन करून, या सर्व प्रलंबित दाव्यांचा निकाल शीघ्र गतीने लागावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे वेलणकर यांनी सांगितले.
-------
प्रमुख थकबाकी असलेल्या आस्थापना व घटक : थकीत रक्कम
* साई कंट्रकशन : १२० कोटी
* मोबाईल टॉवर : ३९० कोटी
* ह्युजेस इसस्पात : १०१ कोटी
* दुबार कर आकारणी प्रकरणे : १३६ कोटी
* पाटबंधारे खाते : ५३.३१ कोटी
* संरक्षण खाते : ५० कोटी