पुणेकरांच्या आरोग्यासाठी महापालिकेकडून ७३४ कोटी खर्च! शहरी गरीब योजनेसाठी ३६२ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 14:54 IST2025-04-14T14:52:32+5:302025-04-14T14:54:14+5:30
महापालिकेच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या उपचारावर गेल्या सहा वर्षात ३३७ कोटी ७१ लाख ४२ हजार ६९० रुपये खर्च करण्यात आले आहे

पुणेकरांच्या आरोग्यासाठी महापालिकेकडून ७३४ कोटी खर्च! शहरी गरीब योजनेसाठी ३६२ कोटी
हिरा सरवदे
पुणे: महापालिकेच्या आरोग्य विभागाने अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजना आणि शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून पुणेकरांच्याआरोग्य उपचारावर सहा वर्षांत ७३३ कोटी ७१ लाख १९ हजार ५ रुपये खर्च केले आहेत. या दोन्ही योजना आजी-माजी कर्मचारी व सभासदांसह नागरिकांसाठी वरदान ठरत असून, त्या आणखी प्रभावी व सक्षमपणे राबविण्याचा मनोदय आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून महापालिकेच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांसाठी आणि आजी सभासद (नगरसेवक) यांच्यासाठी १९६७ साली अंशदायी वैद्यकीय योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत महापालिकेकडून कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारासाठी केंद्रीय आरोग्य योजनांच्या (सीएचएस) शुल्काप्रमाणे ९० टक्के, तर सभासदांना १०० टक्के खर्च दिला जातो. या योजनेत २००५ साली माजी सभासदांचाही समावेश करण्यात आला.
त्यानंतर माजी ॲड. नीलेश निकम यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष असताना, अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजनेच्या धर्तीवर २०११ मध्ये शहरातील गोरगरीब नागरिकांसाठी शहरी गरीब योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शहरातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या आत आहे, अशा कुटुंबातील सदस्यांच्या खासगी रुग्णालयातील उपचारासाठी वर्षाला १ लाख रुपये आर्थिक साहाय्य दिले जाते. आता या योजनेची उत्पन्न मर्यादा १ लाख ६० हजार रुपये करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत किडनी, हृदयरोग व कॅन्सर या दीर्घकालीन आजारांच्या उपचारासाठी वर्षाला दोन लाख रुपये मदत मिळते. योजनेतील गैरप्रकार टाळण्यासाठी सप्टेंबर २०२२ पासून योजनेमध्ये संगणक प्रणालीचा वापर केला जात आहे. त्यामुळे कागदपत्रांमधील अफरा-तफरी उजेडात आल्या आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या उपचारावर २०१९-२० या आर्थिक वर्षापासून २०२४-२५ पर्यंत गेल्या सहा वर्षात ३३७ कोटी ७१ लाख ४२ हजार ६९० रुपये खर्च करण्यात आले आहे. या कालावधीत २६ हजार ७६१ आजी-माजी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा फायदा घेतला आहे. तसेच २०१९-२० ते २०२२-२३ या चार वर्षात १ हजार २६५ विद्यमान नगरसेवकांनी ११ कोटी ८४ लाख १६ हजार २५९ रुपयांचे उपचार वैद्यकीय साहाय्य योजनेतून घेतले आहेत. महापालिकेचे सभागृह विसर्जीत झाल्याने गेली दोन वर्षे आजी सभासद नाहीत. तर २०१९-२० पासून २०२४-२५ पर्यंत २ हजार ३२४ माजी नगरसेवकांवर महापालिकेने २१ कोटी ८६ लाख ५२ हजार ८४५ रुपये खर्च केले आहे.
शहरी गरीब योजनेसाठी ३६२ कोटी २९ लाख
शहरी गरीब योजनेंतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागाने २०१९-२० पासून २०२४-२५ पर्यंत ३६२ कोटी २९ लाख ७ हजार २१० रुपये खर्च केले आहेत. या योजनेचा दरवर्षी साधारण १५ हजार नागरिक लाभ घेतात.
आजी-माजी कर्मचारी व सभासदांसाठी राबवण्यात येणाऱ्या अंशदायी वैद्यकीय व शहरातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी राबविल्या जात असलेल्या शहरी गरीब योजनेसाठी दरवर्षी महापालिकेच्या अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद केली जाते. ही तरतूद कमी पडल्यानंतर वर्गीकरणाद्वारे निधी मिळवला जातो. योजनेतील त्रुटी दूर करून गरजू लोकांना लाभ व्हावा, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत, यासाठी ऑनलाइन प्रक्रिया करण्यात आली आहे. या दोन्ही योजना आणखी प्रभावी व सक्षमपणे राबविण्याचा आमचा प्रयत्न असेल. - डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका.
अंशदायी वैद्यकीय योजना व शहरी गरीब योजनेचा २०१९-२० ते २०२४-२५ पर्यंतचा खर्च
- आजी-माजी कर्मचाऱ्यावर ३३७ कोटी ७१ लाख ४२ हजार ६९० रुपये
- आजी सभासदांवर ११ कोटी ८४ लाख १६ हजार २५९ रुपये
- माजी सभासदांवर २१ कोटी ८६ लाख ५२ हजार ८४५ रुपये
- शहरी गरीब योजनेसाठी ३६२ कोटी २९ लाख ७ हजार २१० रुपये