पुणे : महापालिकेकडून सुधारित प्रारूप प्रभाग रचना सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 09:29 AM2022-01-21T09:29:51+5:302022-01-21T09:30:17+5:30
राजकीय हस्तक्षेपातून काही ठिकाणी प्रभाग रचना सोयीची करण्यात आल्याचा आरोपही यापूर्वी झाला होता.
पुणे : निवडणुक आयोगाने सूचविलेल्या बदलानुसार सुधारित प्रारूप प्रभाग रचना आराखडा पुणे महापालिकेकडून सादर करण्यात आला आहे. हा प्रारूप आराखडा आयोगाने स्वीकारला असून, लवकरच प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महापालिकेने सहा डिसेंबर रोजी निवडूणक आयोगाला शहरातील प्रारूप प्रभाग आराखडा सादर केला होता. मात्र आयोगाने यात आक्षेप घेऊन त्यात नव्याने २४ बदल सुचविले होते़ राजकीय हस्तक्षेपातून काही ठिकाणी प्रभाग रचना सोयीची करण्यात आल्याचा आरोपही या काळात झाला होता. त्यामुळे तारखांवर तारखा मिळत मिळून अखेरीस ५ जानेवारी रोजी व नंतर १७ जानेवारी रोजी पुणे महापालिकेला आराखडा तयार करण्यासाठी वेळ देण्यात आली होती.
अखेरीस २० जानेवारी रोजी महापालिकेच्या निवडणुक विभागाकडून हा आराखडा सादर करण्यात आला असून, त्यावर लवकरच हरकती व सूचना सादर करण्याचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.