आळंदीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा पुणे महापालिकेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 01:33 PM2022-09-17T13:33:32+5:302022-09-17T13:35:02+5:30
पुणे महापालिकेने आळंदी नगर परिषदेला याबाबतचे पत्र पाठविले आहे...
पुणे : शहरासाठी भामा आसखेड धरणातून देण्यात येणाऱ्या पाणी कोट्यातून, पुणे महापालिका आळंदी नगर परिषदेला पाणी देत आहे. परंतु, फेब्रुवारीपासून आळंदी नगर परिषदेने पुणे महापालिकेची पाणीपट्टी व पंपिंगचे २५ लाख ५३ हजार रुपये भरलेले नाहीत. त्यामुळे ही थकबाकी येत्या १ ऑक्टोबरपर्यंत न भरल्यास आळंदीचा पाणीपुरवठा बंद करू कसा इशारा महापालिकेने दिला आहे.
पुणे महापालिकेने आळंदी नगर परिषदेला याबाबतचे पत्र पाठविले आहे. जलसंपदा विभागाने भामा आसखेड धरणातून पुणे शहरासाठी २.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे. भामा आसखेड धरणापासून पुणे शहरापर्यंत हे पाणी आणण्यासाठी महापालिकेने तब्बल ६५ किलोमीटरची जलवाहिनी टाकली आहे. या पाण्यामुळे शहराच्या पूर्व भागाला मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, आळंदी नगर परिषदेनेही भामा आसखेड धरणातून पाण्याची मागणी केली असून, त्यांची ही मागणी अद्याप मंजूर झालेली नाही. यामुळे आळंदीला महापालिकेच्या पाणी कोट्यातून पाणी देण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी ८ फेब्रुवारी रोजी दिला होता, तेव्हापासून पुणे महापालिका आळंदी शहराला पाणीपुरवठा करीत आहे. मात्र आजतागायत आळंदी नगर परिषदेने पाणीपट्टी महापालिकेकडे भरलेली नाही.
तर होणार पाणी बंद
ही थकबाकी लाखांमध्ये असून, गत आर्थिक वर्षात ती ६ लाख २ हजार ५८१ इतकी होती. तर चालू आर्थिक वर्षांत ३० जूनपर्यंतही थकबाकी १९ लाख ५१ हजार ११७ रुपये इतकी आहे. ही दोन्ही देयके महापालिकेने आळंदी नगर परिषदेला वारंवार पाठवूनही त्याला प्रतिसाद देण्यात आलेला नाही. परिणामी अखेरीस महापालिकेने सदर थकबाकी भरली नाही तर, १ ऑक्टोबरपासून पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी माहिती दिली.