महापालिकेची वाहनतळे होणार खुली,प्रशासनाचा विचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 03:51 PM2020-06-03T15:51:51+5:302020-06-03T15:54:53+5:30

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहनांची वर्दळ वाढली.

Pune municipal corporation will be open car parking | महापालिकेची वाहनतळे होणार खुली,प्रशासनाचा विचार सुरू

महापालिकेची वाहनतळे होणार खुली,प्रशासनाचा विचार सुरू

Next

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बंद असलेले उद्योग व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहेत. बाजारपेठही सुरू होऊ लागल्या असून रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे पालिकेने वाहनतळे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या मालकीची ही वाहनतळे येत्या दोन दिवसात खुली होणार आहेत.
 कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर २४ मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर जसजशी कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढली तसतसा लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आले. त्यानंतर कंटेन्मेंट झोनही तयार करण्यात आले. नागरिकांना बाहेर पडता येत नसल्याने रस्ते ओस पडले होते. रस्त्यावर वाहनांची अजिबात वर्दळ नव्हती. सर्व व्यवहार, दुकाने, व्यापार, व्यवसाय आणि नोकरीची ठिकाणे, कार्यालये बंद असल्याने नागरिकही बाहेर पडत नव्हते. 
लॉकडाऊनच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यांमध्ये मात्र कंटेन्मेंट झोन वगळता अन्य ठिकाणी काही प्रमाणात सवलती देण्यात आल्या. अत्यावश्यक सेवांसह अन्य सेवाही सुरू करण्यात आल्या. पालिकेची विकासकामे हळूहळू सुरू करण्यात आली आहेत. लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू करतानाच केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार आणखी सवलती दिल्या जाण्याची शक्यता असून कंटेन्मेंट झोनमध्ये कडक उपाययोजना केल्या जाणार आहेत. शहरातील बऱ्यापैकी दुकाने, व्यवसाय आणि उद्योग सुरू झाले आहेत. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असून खासगी कार्यालयेही सुरू होण्याची शक्यता आहे. 
गेल्या काही दिवसात नागरिकांची वर्दळ वाढली असून वाहनांची संख्याही वाढू लागली आहे. पार्किंगचा प्रश्न पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. यासोबतच ज्यांनी पालिकेची वाहनतळ निविदा काढून चालविण्यास दिली आहेत त्या ठेकेदारांचे नुकसान होत असून मनुष्यबळाच्या रोजगाराचा प्रश्नही आहे. त्यापार्श्वभूमीवर पालिकेच्या मालकीच्या २६ वाहनातळापैकी कंटेन्मेंट झोन वगळता उर्वरीत सर्व वाहनतळे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणती वाहनतळे सुरू करायची याची यादी निश्चित केली जाणार असून येत्या दोन दिवसात ही वाहनतळ सुरू करण्यात येणार आहेत. 
----------- 
महापालिकेच्या मालकीची वाहनतळे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाहनतळे सुरू केल्याने पार्किंगसाठी पुन्हा जागा उपलब्ध होणार आहे. कंटेन्मेंट झोन वगळता अन्य वाहनतळे सुरू केली जाणार असून त्याची यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन दिवसात ही वाहनतळे सुरू होणार आहेत.
 - राजेंद्र मुठे, उपायुक्त, मालमत्ता व्यवस्थापन विभाग

Web Title: Pune municipal corporation will be open car parking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.