पुणे महापालिका ६ हजार पथदिव्यांना एकसारखी रंगरगोटी करणार; तब्बल २ कोटी खर्च येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 08:22 PM2022-12-09T20:22:38+5:302022-12-09T20:22:53+5:30
एका खांबाला सुमारे दोन हजार रूपये खर्च येणार
पुणे : येत्या जानेवारीमध्ये जी २० परिषदेसाठी महापालिकेचा विद्युत विभाग शहरातील सुमारे सहा हजार पथदिव्यांच्या खांबाची एकसारखी रंगरंगोटी करणार आहे. एका खांबाला सुमारे दोन हजार रूपये खर्च येणार आहे. पथदिव्यासाठी काही ठिकाणी भुमिगत केबल टाकण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक पथदिवे स्वतंत्रपणे चालु बंद करण्यासाठी स्क्वाडा यंत्रणा बसविण्यात येणार आहे . या कामासाठी सुमारे २ कोटी १३लाख रूपये खर्च येणार आहे.
जगातील आर्थिकदृष्ट्या प्रगत २० देशांची 'जी २० परिषद' २०२३ मध्ये पुण्यात होणार आहे. पुण्यातही जानेवारी आणि जूनमध्ये या परिषदेच्या तीन बैठका होणार आहेत. या बैठकीसाठी विविध १०० हून अधिक देशांचे प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. त्यामुळे शहराचा मेकओव्हर करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्नशील आहे. पुण्यातील ६० चौक आणि आयलँडचे सीएसआरच्या माध्यमातून ब्युटीफिकेशन करण्याच्या कामाच्या निविदा काढल्या गेल्या आहेत.
या परिषदेच्या बैठकीसाठी येणारे या विविध देशांचे प्रतिनिधी लाेहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्ता आणि इतर काही भागांतून प्रवास करणार आहेत . त्यामुळे या मार्गावरील पथदिवे एकसारखे असावेत. ते नादुरुस्त किंवा बंद असु नये यासाठी पालिकेच्या विद्युत विभागाकडून उपाययाेजना केल्या जात आहे. सध्या असित्वात असलेल्या पथदिव्यांंच्या खांबाची रंगरंगाेटी करण्यात येणार असुन त्यांना एकसारखा रंग दिला जाणार आहे. त्यासाठी प्रति खांबाकरीता दाेन हजार रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. काही ठिकाणच्या रस्त्याच्या कडेला असलेले हे पथदिव्यांचे खांब डियवाडरच्या बसविले जाणार आहे. पथ दिव्यांंना भुमिगत केबलने वीजपुरवठा करण्यासाठी सुमारे १८ किलोमीटर लांबीच्या केबल टाकल्या जाणार आहेत अशी माहिती विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी दिली.
एक हजार फायबरचे पथदिवे बसविण्याचा विचार
लाेहगाव विमानतळ ते सेनापती बापट या मार्गावर नव्याने एक हजार फायबरचे पथदिव्यांचे खांब बसविण्याचा विचार केला जात आहे. या एका खांबाची किंमत सुमारे २३ हजार रुपये इतकी आहे. त्यासाठी सुमारे दाेन काेटी ३० लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.