पुणे महापालिका तब्बल ६ हजार झाडे तोडणार? अंतिम निर्णय राज्य सरकार घेणार...!
By राजू हिंगे | Published: May 7, 2023 01:37 PM2023-05-07T13:37:34+5:302023-05-07T13:37:57+5:30
नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित झाडे तोडण्यास पुणेकरांचा कडाडून विरोध
पुणे : पुणे महानगरपालिकेने नदी सुधार प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शहरातून जाणाऱ्या मुळा आणि मुठा नदीलगतची सुमारे ६ हजार झाडे तोडण्याची योजना आखली आहे. नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित झाडे तोडण्यास विरोध होत असताना, पुणे महानगरपालिका अंतिम निर्णय घेण्यासाठी राज्यसरकारकडे या बाबतचा अहवाल पाठवणार आहे.
नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा अंतर्गत महापालिका पुणे शहराच्या मध्यातून जाणाऱ्या मुळा - मुठा नदीच्या दोन्ही काठांचा विकास करणार आहे. सुमारे ४४ किलोमीटर नदी काठावर पिचिंग करून नदीचे खोलीकरण करण्यात येणार आहे. तसेच नदी काठावर ठिकठिकाणी उद्याने, छोटी मैदाने, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, विरंगुळा केंद्र करण्यात येणार असून मोठ्या प्रमाणावर वृक्षा रोपण ही करण्यात येणार आहे. यासाठी टप्पाटप्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. काही ठिकाणी नदीतील गाळ काढून नदी प्रवाही करण्यात येईल. तसेच संगम पूल ते बंडगार्डन पुला दरम्यान बोटिंगची सुविधाही करण्यात येणार आहे. ही कामे करत असताना पूर रेषा, आणि पर्यावरणाचे कुठेही उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेऊन तसेच पर्यावरणा संबंधित सर्वच विभागाच्या परवानग्या घेऊनच हा प्रकल्प केला जाणार आहे. सुमारे ४ हजार ७०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.
प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शहरातून जाणाऱ्या मुळा आणि मुठा नदीलगतची ६ हजार झाडे तोडण्याची योजना महापालिकेने आखली आहे. या निर्णयाला विरोध म्हणून, पर्यावरणवादी लोकांनी त्यांना मिळालेला पालिकेचापुरस्कार ‘पर्यावरण दूत’ परत केला. पर्यावरणप्रेमींनी चिपको आंदोलन केले. त्यामुळे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रस्तावित झाडे तोडण्यास विरोध होत असताना, पुणे महानगरपालिका अंतिम निर्णय घेण्यासाठी राज्यसरकारकडे या बाबतचा अहवाल पाठवणार आहे.