पुणे महापालिका जुन्या सोनोग्राफी मशीन नष्ट करणार : आरोग्य विभागाची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 08:34 PM2020-09-28T20:34:53+5:302020-09-28T20:35:40+5:30
या मशीन नष्ट करण्यासाठी स्वच्छ सेवा सहकारी संस्थेची मदत घेतली जाणार
पुणे : शहरातील विविध रुग्णालयांमध्ये वापरल्या गेलेल्या जुन्या बंद असलेल्या सोनोग्राफी मशीन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून नष्ट केल्या जाणार आहेत. या मशीन नष्ट करण्यासाठी स्वच्छ सेवा सहकारी संस्थेची मदत घेतली जाणार आहे. या कारवाईसाठी मशीन मालक असलेल्या लॅब आणि हॉस्पिटलकडून शुल्क भरून घेण्यात आले आहे. एकूण ६० मशीन नष्ट केल्या जाणार असून पहिल्या टप्प्यात मंगळवारी सात मशीन नष्ट केल्या जाणार आहेत.
राज्य सरकारने जुन्या आणि अव्यवसायिक सोनोग्राफी मशीनची वैज्ञानिक विल्हेवाट लावण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केलेली आहेत. जुन्या सोनोग्राफी मशिनचा गैरवापर लिंगनिदान आणि स्त्री भ्रूणहत्येसाठी होण्याची शक्यता आहे. डायग्नोस्टिक तंत्र (नियमन आणि गैरवापर प्रतिबंध) कायदा १९९४ (पीसीपीएनडीटी) च्या अंमलबजावणीवर देखरेखीसाठी राज्य पर्यवेक्षक मंडळाचे गठनही यापूर्वी करण्यात आलेले आहे. या मशीन नष्ट करण्यासाठी (स्क्रॅपिंग) मानक कार्यप्रणाली (एसओपी) सोनोग्राफी मशीन्स समितीने तयार केलेल्या आहेत. या अल्ट्रासाऊंड मशीनची वैज्ञानिकदृष्ट्या विल्हेवाट लावण्यासाठी शासनाने धोरण तयार केलेले असून शासनाने यासंदर्भात आदेशही काढलेले आहेत. ज्या मशीन टाकून देण्यात आल्या किंवा वापरात नाहीत अशा मशीनचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.
या मशीनची ई-कचरा म्हणून कशी विल्हेवाट लावायची अथवा विक्री करायची याबाबतही मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. या मशीनच्या वेगवेगळ्या भागांना वेगळे करून त्याचाही दुरुपयोगासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे शासनाने प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आदींची देखरेख समितीही तयार केलेली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहराच्या विविध रुग्णालयातील बंद असलेल्या किंवा वापरात नसलेल्या ६० सोनोग्राफी मशीनच्या विल्हेवाटीचा निर्णय घेतल्याचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी सांगितले.
---------
राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार शहरातील बंद असलेल्या किंवा वापरात नसलेल्या जुन्या सोनोग्राफी मशीनची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. शहरात अशा ६० मशीन असून पहिल्या टप्प्यात मंगळवारी सात मशीन नष्ट केल्या जाणार आहेत. त्यासाठी स्वच्छ संस्थेची मदत घेतली जाणार असून संस्थेचा ई-वेस्ट विभाग या मशीन नष्ट करणार आहे. त्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे.
- डॉ. कल्पना बळीवंत, सहायक आरोग्य अधिकारी