पुणे महापालिका वाढवणार 'कोरोना योद्ध्यां' चे मनोबल; 'अशा' प्रकारे देणार शाबासकीची थाप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 03:35 PM2020-10-10T15:35:13+5:302020-10-10T15:36:51+5:30
महापालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेत कोरोनाला रोखण्यासाठी काम केले.
पुणे : कोरोनाच्या काळात 'कोरोना योद्धा' नावाची प्रशस्तीपत्रके वाटण्याचे आणि त्याला सोशल मीडियावर टाकत मिरवण्याची टूम निघाली. या प्रकारामुळे खरोखरीच काम करणारे मात्र पडद्यामागेच राहिले. आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आता महापालिकाच त्यांना 'कोविड योद्धा' प्रमाणपत्र देणार आहे. या उपक्रमाची सुरुवात वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयापासून झाली आहे.
मार्च महिन्यात कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण पुण्यामध्ये आढळून आला. तेव्हापासून आजवर गेल्या सहा-सात महिन्यात महापालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेत कोरोनाला रोखण्यासाठी काम केले. कोविड सेंटर असो की विलगीकरण कक्ष असो, प्रतिबंधात्मक क्षेत्र असो वा सर्वेक्षण असो सर्व प्रकारच्या कामात हे अधिकारी कर्मचारी झोकून देऊन काम करीत आहेत. रुग्णांची सेवा, नागरिकांमध्ये जनजागृती करणे, त्यांना माहिती देणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे अशा प्रकारची कामेही अद्याप सुरू आहेत. या काळात अनेकांना कोरोनाची लागण झाली. काही जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर, अनेक जण बरे होऊन घरी परतल्यावर पुन्हा कामावर रुजू देखील झाले.
या काळात समाजातील 'चमकोगिरी' करणाऱ्या काही जणांनी खाजगी संस्थांकडून 'कोरोना योद्धा' प्रशस्तीपत्रके मिळविली. ही प्रशस्तिपत्रके सोशल मीडियावर टाकून स्वतःची प्रसिद्धीही करून घेतली. कधीही नाव न ऐकलेल्या संस्था या काळात अशी प्रमाणपत्रे वाटत सुटल्याचे दिसून आले. काही संस्थांची तर नोंदणी ही नसल्याचे समोर आले. आपल्या कुटूंबाचा-स्वतःचा विचार न करता अहोरात्र मेहनत घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटणार्या महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मात्र ही प्रमाणपत्रे मिळाली नाहीत. त्यामुळे आपल्या कामाची कोणी दखल घेत नाही अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आपल्या कर्मचाऱ्यांचे मनोबल आणि हुरूप वाढविण्यासाठी महापालिका त्यांना कोविड योद्धा अशी प्रमाणपत्र देणार आहे.
त्याची सुरुवात वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयापासून करण्यात आली. क्षेत्रीय कार्यालयांतर्गत काम करणाऱ्या सफाई कर्मचारी, केटरींग व्यवस्था पाहणारे कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस इत्यादी ५० जणांचा कोविड योद्धा म्हणून उपायुक्त जयंत भोसेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सहायक आयुक्त संतोष वारूळे, स्थापत्य विभागाचे उप अभियंता उमाकांत डीग्गीकर आदी उपस्थित होते.