Pune Municipal Corporation Decision: दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे शुल्क महापालिका भरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 11:32 AM2021-12-22T11:32:37+5:302021-12-22T11:32:46+5:30
महापालिका शुल्क भरणार या तरतुदीस मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता
पुणे : पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या शाळातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण मंडळाकडील परीक्षा शुल्क महापालिका भरणार आहे. याच्या तरतुदीस मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली.
समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिलेल्या महितीनुसार, महापालिकेच्या शिक्षण विभागातील ४४ माध्यमिक शाळांमधून ४ हजार ३९२ विद्यार्थी या वर्षी दहावीच्या परीक्षेला बसणार आहेत. त्यांचे प्रति विद्यार्थी ४१५ रुपये आणि तंत्रशाळेतील २०० विद्यार्थ्यांचे प्रति ५२५ रुपये परीक्षा शुल्क भरण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या शिक्षण विभागातील पाच कनिष्ठ महाविद्यालयातील ४४९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत. या सर्वांचे वाणिज्य शाखेचे ४३० रुपये आणि विज्ञान शाखेसाठी प्रति ४९० रुपये परीक्षा शुल्क भरण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी वेळ वाढून देण्यात आला
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी - बारावीच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर झाले असून विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी वेळ वाढून देण्यात आला आहे. मार्च -एप्रिल २०२२ मध्ये सर्व विषयांचे पेपर सकाळी ११ ऐवजी साडेदहा वाजता सुरू केले जाणार आहेत. राज्य मंडळातर्फे इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत होणार आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे लागत आहे. काही विद्यार्थी सध्या प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिक्षण घेत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव झालेला नाही. त्यामुळे राज्य मंडळाने लेखी परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला.